Fri, Apr 26, 2019 16:14होमपेज › Nashik › भुजबळ अडीच वर्षांनंतर सभागृहात

भुजबळ अडीच वर्षांनंतर सभागृहात

Published On: Jul 05 2018 1:40AM | Last Updated: Jul 04 2018 11:35PMनाशिक : प्रतिनिधी

अडीच वर्षांनंतर प्रथमच विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने सभागृहात दाखल झालेले माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल 80 लक्षवेधी सूचना मांडल्या.बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून ईडीने भुजबळ यांना अटक केली होती. दरम्यानच्या काळात जामिनासाठी वारंवार केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने भुजबळ तब्बल अडीच वर्षे तुरुंगात होते. त्यामुळे विधान सभेचे सदस्य असतानाही त्यांना सभागृहाच्या कामकाजात भाग घेता आला नव्हता. तुरुंगात असतानाही भुजबळ यांनी सरकारला पत्र लिहून जिल्ह्यातील समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. रखडलेल्या मांजरपाडा प्रकल्पासाठी निधी, येवला तालुक्यातील पाणीटंचाई यासारख्या समस्यांचा त्यात समावेश होता. तुरुंगात असल्यामुळे भुजबळ यांची सरकारला प्राप्त होणारी पत्रे चर्चेचा विषय ठरली होती. आता हेच भुजबळ सध्या जामिनावर तुरुंगातून बाहेर आले आहेत.सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरला सुरू आहे. अडीच वर्षांनंतर त्यांनी पहिल्यांदाच सभागृहात पाऊल ठेवले आहे. नुसतेच पाऊल ठेवले नाही तर तब्बल 80 लक्षवेधी सूचना सादर केल्या असून, त्यावरून सरकारला घेरण्याचे संकेतही त्यांनी दिलेआहेत. 

या सगळ्याच लक्षवेधींवर चर्चा होणार की नाही, हे प्रत्यक्ष अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर स्पष्ट होणार असले तरी ज्या रखडलेल्या प्रकल्पांवर भुजबळ यांनी तुरुंगात असतानाही लेखी पाठपुरावा सुरू ठेवला होता, त्यात मांजरपाडासारख्या प्रकल्पावर सभागृहात ते नेमकी काय भूमिका घेतात, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. सादर केलेल्या लक्षवेधींमध्ये नुसतेच नाशिक जिल्ह्यातील प्रश्‍न नसून अन्य जिल्ह्यांमधीलही प्रश्‍नांचा त्यात समावेश आहे.