होमपेज › Nashik › नाशिककरांना तीन आठवड्यांनी सुर्यदर्शन

नाशिककरांना तीन आठवड्यांनी सुर्यदर्शन

Published On: Aug 10 2019 1:04PM | Last Updated: Aug 10 2019 12:44PM

संग्रहीत फोटोनाशिक : प्रतिनिधी

नाशिककरांना अखेर तीन आठवड्यानंतर आज (दि.१०) सकाळी सुर्याचे दर्शन झाले. त्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळाला. पावसाचा जोर ओसरला असला तरी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पहाटेपासून अधूनमधून हलक्या सरी कोसळत आहेत. गंगापूरच्या विसर्गात वाढ करण्यात आल्याने गोदाघाटावरील मंदिरे पुन्हा एकदा पाण्याखाली गेली आहेत.

जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. नाशिक शहरात पहाटेपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. त्यामध्ये सुर्याचे दर्शन झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. दुसरीकडे मात्र, गंगापूर धरणात होणारी पाण्याची आवक सुरूच असल्याने शुक्रवारी (दि.९) सायंकाळनंतर धरणातील विसर्ग वाढविण्यात आला. धरणातून सद्यस्थितीत ७ हजार २१५ क्युसेक विसर्ग केला जात असून अहिल्यादेवी होळकर पुलाजवळ पाण्याचा वेग १० हजार १५४ क्युसेक इतका आहे. रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारूतीच्या कमरेएवढे पाणी आहे.

गोदेच्या पातळीत पुन्हा एकदा वाढ झाल्याने काठावरील मंदिरांमध्ये पाणी शिरले आहे. ग्रामीण भागांमध्येही पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यावासियांना दिलासा मिळाला. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाण्यात अधूनमधून पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी कोसळत आहे. पावसाचा जोर ओसरल्याने जनजीवन पुर्वपदावर येण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान, गंगापूरच्या विसर्गात वाढ केल्याने निफाड तालूक्यातील नांदुरमध्यमेश्वरचा विसर्ग ४२ हजार ६९० क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये ४७२.२ मिमी पाऊस झाला. यंदाच्या हंगामात एकूण १ लाख ७९ हजार ४४८ मिमी पावसाची नोंद झाली असून त्याची टक्केवारी १

१०च्या आसपास आहे.