Mon, Apr 22, 2019 15:46होमपेज › Nashik › धार्मिक स्थळांसाठी सुप्रीम कोर्टात जाणार 

धार्मिक स्थळांसाठी सुप्रीम कोर्टात जाणार 

Published On: Aug 15 2018 1:24AM | Last Updated: Aug 15 2018 1:24AMनाशिक : प्रतिनिधी

धार्मिक स्थळांबाबत मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेअंतीही कोणताच ठोस तोडगा निघू न शकल्याने आता धार्मिक स्थळे वाचविण्याच्या अनुषंगाने संस्कार केंद्र बचाव समिती सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी करत आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी 16 ऑगस्ट रोजी महापौरांच्या निवासस्थानी बैठक बोलविण्यात आली आहे. 

शहरातील धार्मिक स्थळांच्या अतिक्रमण मोहिमेसंदर्भात सोमवारी (दि.13) रामायण बंगला येथेे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेण्याचे ठरले होते. त्यानुसार मंगळवारी (दि.14) आमदार देवयानी फरांदे यांनी पुढाकार घेत सभागृहनेते दिनकर पाटील, भाजपाचे महानगर उपाध्यक्ष अनिल भालेराव यांच्यासह संस्कार केंद्र बचाव समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री महाजन यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी समिती सदस्यांचे मत ऐकून घेऊन त्यावर चर्चा केली.

उपस्थित समिती सदस्यांनी न्यायालयाच्या निर्णयात असणार्‍या त्रुटी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यानंतर समिती सदस्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशीदेखील या प्रकरणी चर्चा केली.यावेळी आमदार फरांदे यांच्यासह संस्कार केंद्र बचाव समितीचे अध्यक्ष विनोद थोरात, अ‍ॅड. मीनल भोसले, प्रवीण जाधव, नंदू कहार, कैलास देशमुख, सतीश हाके, विहिंपचे एकनाथ शेटे आदी उपस्थित होते. शासनाने न्यायालयात बाजू मांडली आहे. मात्र, दिलासा मिळालेला नाही. यामुळे बचाव समितीनेच आता पाऊल उचलावे असा सल्ला या बैठकीतून देण्यात आला. यामुळे सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात येणार आहे.