Thu, Jul 18, 2019 16:30होमपेज › Nashik › जिल्हा प्रशासनाचे वरातीमागून घोडे!

जिल्हा प्रशासनाचे वरातीमागून घोडे!

Published On: Aug 20 2018 1:38AM | Last Updated: Aug 19 2018 10:42PMनाशिक : प्रतिनिधी

पृथ्वीवरील देवभूमी अशी ओळख प्राप्त केलेल्या केरळमध्ये पावसाने हाहाकार माजविला आहे. महापुरामुळे राज्यात 325 बळी गेले असून, लाखो लोक बेघर झाले आहेत. केरळमध्ये ओढावलेल्या या नैसगिक परिस्थितीतून धडा घेतलेल्या जिल्हा प्रशासनाने आत्ता राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकच्या (एनडीआरएफ) माध्यमातून निफाड तालुक्यातील चांदोरी-सायखेडा या गावांमधील ग्रामस्थांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. पूर आल्यास त्यावर कशी मात करायची याचे धडेच ग्रामस्थांना दिले जाणार आहेत. प्रशासनाची ही कृती म्हणजे वराती मागून घोडे अशीच आहे. 

केरळमध्ये महापुराने थैमान घातले असून, एनएडीआरएफचे जवान रात्रंदिवस तेथे बचावकार्यात गुंतले आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातही गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने पुनरागमन केले आहे. धरणांच्या पातळीत वाढ झाली आहे. सद्यस्थितीत गंगापूर, दारणेसह इतर एकूण 13 प्रकल्पांमधून विसर्ग केला जात आहे. त्यामुळे गोदावरी व दारणा नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. निफाड तालुक्यातील सायखेडा-चांदोरी व पंचक्रोशीतील गावांना या पुराच्या पाण्याने धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पुरातून त्यातून कसा बचाव करायचे याचे ग्रामस्थांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी एनडीआरएफचे पथक मंगळवारपासून (दि.21) या गावांमध्ये दाखल होणार आहे. या पथकातील जवान पूर तसेच इतर नैसर्गिक व मानवनिर्मित संकटाची परिस्थिती कशी हाताळायची याचे ग्रामस्थांना प्रशिक्षण देणार आहे.  केरळ घटनेनंतर जागे होत प्रशिक्षणाचा घाट घातल्याने सर्वत्र टीका होत आहे.