Mon, Jun 17, 2019 18:15होमपेज › Nashik › अनधिकृत बांधकामांवर ३१ मेनंतर पडणार हातोडा

अनधिकृत बांधकामांवर ३१ मेनंतर पडणार हातोडा

Published On: May 15 2018 1:35AM | Last Updated: May 15 2018 1:35AMनाशिक : प्रतिनिधी 

शहरातील अनधिकृत बांधकामे शासनाच्या धोरणानुसार प्रस्ताव सादर करुन 31 मेपर्यंत नियमित करुन घ्यावीत. त्यानंतर मात्र कोणतीही गय न करता अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविला जाईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बिल्डर लॉबीला दिला. तसेच, पूररेषा, बफर झोन, डिफेंस झोन या जागांवरील बांधकामांना हे धोरण लागू नसल्याने कोणत्याही परिस्थितीत ही बांधकामे पाडण्यात येतील, असा सज्जड दम आयुक्तांनी भरला. 

नाशिक क्रेडाईची ‘कंपाऊंडींग स्ट्रक्‍चर, ऑटो डिसीआर व डिसीआर प्रणाली’ या विषयावर सोमवारी (दि.14) हॉटेल गेट वे येथे कार्यशाळा पार पडली. यावेळी बांधकाम व्यावसायिकांना मार्गदर्शन करताना आयुक्त मुंढे यांनी हा इशारा दिला. शासनाने अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी तयार केलेल्या धोरणांची बांधकाम व्यावसायिक व वास्तुविशारद यांना उदाहरणांसह माहिती देत त्यांच्या शंकाचे निरसन केले. ते म्हणाले,  शासनाने अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी या माध्यमातून एक संधी दिली आहे. येत्या 31 मे रोजी सायंकाळी 5.45 वाजेपर्यंत  अनधिकृत बांधकामे अधिकृत करुन घ्यावीत. दिलेल्या मुदतीनंतर एकही प्रस्ताव स्वीकारला जाणार नाही, हे बांधकाम व्यावसायिकांनी लक्षात ठेवावे. 31 मेनंतर अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविण्यात येईल. शासनाच्या नियमानुसार एकूण बांधकामांच्या 30 टक्के भागच अधिकृत करता येईल. नाशिक शहरातील अनधिकृत बांधकामांचे प्रमाण हे 30 टक्क्यांच्या आत असून या नियमानुसार बांधकामे अधिकृत करून घ्यावीत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शहरात सध्या साडेसहा हजारांहून अधिक अनधिकृत बांधकामे आहेत. तसेच, वेळोवेळी सूचना देऊनही शहर व परिसरातील लॉन्स व मंगल कार्यालये नियमानुसार अधिकृत केली गेलेली नाहीत. फक्‍त पाच मंगल कार्यालयांनी अधिकृत परवाना घेतला असून, 170 हून अधिक कार्यालये अनधिकृत आहेत. त्यांनीदेखील 31 मेपूर्वी मंगल कार्यालये अधिकृत करुन घेतली नाही तर त्यांच्यावरदेखील बुलडोझर चालविण्यात येईल, असा इशारा मुंढे यांनी दिला. तसेच, रुग्णालये नोंदणी व नूतनीकरणासाठी चार्ज ऑफ युज व कपाऊंडिंग चार्जेस या दोन नियमांनुसार रुग्णालयांची बांधकामे अधिकृत करुन न घेतल्यास त्यांच्यावरदेखील कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे सांगितले. 

शहरातील नदीपात्रालगत, निळ्या पूररेषेत, लष्करी विभागाच्या हद्दीत, बफर झोन, डंपिंग ग्राऊंड, हरित पट्टा, वनजमिनी, हेरिटेज जागा आदी ठिकाणी जर अनधिकृत बांधकामे असतील तर ते शासनाच्या धोरणानूुसार अधिकृत केले जाणार नाहीत. अशा अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आयुक्त मुंढे यांनी यावेळी दिल्याने बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.