Mon, Jun 17, 2019 02:11होमपेज › Nashik › नाशिक बाजार समितीवर सरकारकडून प्रशासक नियुक्त

नाशिक बाजार समितीवर सरकारकडून प्रशासक नियुक्त

Published On: Dec 31 2017 1:29AM | Last Updated: Dec 30 2017 11:50PM

बुकमार्क करा
पंचवटी : वार्ताहर

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ अखेर शनिवारी (दि.30) बरखास्त करण्यात आले. सर्व संचालकांना दोषी ठरविण्यात येऊन बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. मात्र, संचालक मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेत बरखास्तीच्या निर्णयाला 15 दिवसांची स्थगिती मिळवली आहे. यावर आता जिल्हा उपनिबंधक काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. 2014 च्या लेखा परीक्षणामध्ये बाजार समितीचे सभापती, संचालक आणि सचिवांवर ताशेरे ओढण्यात आले होते. या अहवालामध्येबाजार समितीच्या भूखंडांची बेकायदेशीर विक्री, इमारतीचा वाढीव एफएसआय संचालकाच्या जावयाला बाजारभावापेक्षा कमी दराने विक्री करणे, शासन नियमांची पायमल्ली करणे, गैरमार्गाने मंजूर करणे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा अपहार, कर्मचार्‍यांना देण्यात येणारा महागाई भत्ता आणि बोनसच्या रकमेचा अपहार करताना तीन कर्मचार्‍यांना लाच लुचपत विभागाच्या अधिकार्‍यांकडून अटक अशा विविध कारणांनी बाजार समितीचा कारभार चर्चेत आला होता.

यात सभापती देवीदास पिंगळे यांना तुरुंगात जावे लागले होते. जामीन मिळाल्यानंतर बाजार समितीच्या कामकाजात हस्तक्षेप करू नये, आणि नाशिक शहरात चार महिने येऊ नये असे आदेश उच्च न्यायालयाने बजावले होते. अशा एका ना अनेक कारणाने बाजार समिती चर्चेत राहिली होती. त्यामुळे बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त करावे अशी मागणी देखील अनेकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती.

यावर जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी 3 जून रोजी बाजार समितीला नोटीस बजावली होती. तेव्हापासून बरखास्तीची टांगती तलवार कायम होती.  बरखास्तीच्या आदेशात सर्व संचालकांवर ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच, प्रशासक म्हणून अप्पर निबंधक, सहकारी संस्था अनिल चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. मात्र, संचालक मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेत बरखास्तीच्या निर्णयाला 15 दिवसांची स्थगिती मिळवली आहे.