Wed, Apr 24, 2019 01:40होमपेज › Nashik › टेलीमेडिसीन ही वैशिष्ट्यपूर्ण आरोग्यसेवा : आदित्य ठाकरे

टेलीमेडिसीन ही वैशिष्ट्यपूर्ण आरोग्यसेवा : आदित्य ठाकरे

Published On: Aug 26 2018 1:28AM | Last Updated: Aug 25 2018 11:59PMसिन्‍नर : प्रतिनिधी

नाशिक लोकसभा मतदारसंघात नेहमी वैशिष्ट्यपूर्ण तितकेच नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या खासदार हेमंत गोडसे यांनी पांढुर्लीसारख्या ग्रामीण भागात टेलीमेडिसिन सारखी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्याचा रुग्णांना फायदा होणार असून अशा अत्यावश्यक सुविधांची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केले.

तालुक्यातील पांढुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात खा. हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून नाशिक विभागातील पहिल्या टेलिमेडिसीन  प्रणालीचा शुभारंभ युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शीतल सांगळे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे, तालुकाप्रमुख सोमनाथ तुपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार डेकाटे, सिन्नरचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड-मते, पांढुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रिया वेटकोळी, डॉ. लहू पाटील आदी उपस्थित होते. ग्रामीण भागातील रुग्णांना अत्यावश्यक सुविधा गावातच मिळाल्यास ग्रामीण भागातील आरोग्याचे प्रमाण सुधारणार असल्याचे सांगून ठाकरे यांनी आत्याधुनिक सुविधांसाठी रुग्णांना शहरातील बड्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आर्थिक झळ सोसण्याची गरज भासणार नसल्याचे नमूद केले. या नावीन्यपूर्ण सुविधेच्या निमित्ताने खासदार कसा असावा तर गोडसे यांच्यासारखा, असे नमून करीत ठाकरे यांनी खा. गोडसे यांच्या कामाचे कौतुक केले. आरोग्यसेवेसाठी सदैव तत्पर असणार्‍या डॉक्टरांच्या पाठीशी आपण ठाम उभे असून वेळोवेळी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

टेलीमेडिसीन प्रणाली अंतर्गत येणार्‍या स्वास्थ्य  स्लेट या उपकरणाद्वारे रुग्णाच्या रक्ताची तपासणी करून मलेरिया डेंग्यू यासारख्या रोगांचे त्वरित निदान होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे हाय नेत्र या उपकरणाद्वारे डोळ्यांसंदर्भात जडलेल्या आजाराचे त्वरित निदान होण्यास मदत होणार आहे. इको डिजिटल स्टेथोस्कोपद्वारे हृदयासंबंधी विविध आजारांचे निदान होण्यास मदत होईल. यामुळे रुग्णांचा प्रवास खर्च व वेळ वाचेल असे खा. गोडसे यांनी सांगितले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगतातून आरोग्य सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी शिवसेना पदाधिकारी नगरपालिका, खरेदी-विक्री संघ, पंचायत जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी संस्थांच्या पदाधिकार्‍यांसह पांढुर्ली, शिवडे, बेलू, आगासखिंड, विंचूरदळवी, घोरवडसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.