Thu, Jul 18, 2019 00:57होमपेज › Nashik › लोकांना ठेचून मारणे हा अधोगतीचा अखेरचा टप्पा

लोकांना ठेचून मारणे हा अधोगतीचा अखेरचा टप्पा

Published On: Jul 17 2018 1:35AM | Last Updated: Jul 16 2018 11:15PMनाशिक : प्रतिनिधी

माणसाने हिंसेसाठी पोलीस, सैन्यदल अशी व्यवस्था निर्माण केली असताना, तिला डावलून व्हॉट्सअ‍ॅपवरचा एक मेसेज वाचून लोकांना ठेचून मारणे योग्य नाही. ‘राईनपाडा’सारख्या घटना हा माणसाच्या अधोगतीचा अखेरचा टप्पा असून, त्याची सुरुवात खूप आधीपासून झाली आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी व्यक्‍त केले. 

दवप्रभा फिल्म्स अ‍ॅण्ड प्रॉडक्शन्स व झेप संस्था यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित शिक्षणतज्ज्ञ भावना भार्गवे स्मृती व्याख्यानमालेतील प्रगट मुलाखतीत ते बोलत होते. शंकराचार्य संकुल येथे सोमवारी (दि. 16) हा कार्यक्रम झाला. प्रा. डॉ. वृंदा भार्गवे यांनी कुलकर्णी यांची मुलाखत घेत त्यांना त्यांच्या अभिनेत्यापर्यंतच्या प्रवासापासून ते सामाजिक स्थिती, शिक्षणपद्धती, जात-धर्मव्यवस्था आदी अनेक मुद्यांवर बोलते केले. कुलकर्णी म्हणाले की, इंजिनिअरिंगमध्ये रस नसल्याने त्याकडे पाठ फिरवत आपण कला शाखेत प्रवेश घेतला, तेव्हा नाटक आवडू लागले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचे शिक्षण घेतले. निरनिराळ्या टप्प्यांवर नाटके, सिनेमे करीत गेलो व त्यातून विकसित होत गेलो. ‘गांधी विरुद्ध गांधी’ हे पहिले व्यावसायिक नाटक करताना महात्मा गांधी हा माणूस समजून घेता आला. सध्याच्या हिंसक घटनांविषयी बोलताना ते म्हणाले की, एका अभ्यासानुसार, जास्तीत जास्त 10 हजार माणसे एकत्र वास्तव्य करू शकतात. आता कोट्यवधी माणसे एकत्र राहू लागल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या. हिंसा ही माणसाची मूलभूत प्रवृत्ती आहे.सध्याच्या हत्यांच्या घटना हा अधोगतीचा अखेरचा टप्पा असला, तरी त्याची सुरुवात खूप आधीपासून झाली. आपण सारेच या हिंसेसाठी जबाबदार आहोत.  

आपल्या विवेकी प्रवासाबद्दल ते म्हणाले की, समाजव्यवस्थेत कोणालाही आपला जात-धर्म व अन्य बाबी निवडण्याचा अधिकार नाही. ज्येष्ठांचे बोलणे प्रमाण मानले जाते. आपल्याआधी जन्म होणे हे कोणाचेही कर्तृत्व ठरू शकत नाही. याउलट सध्याच्या तरुणाईबद्दल आपल्याला आदर वाटतो. देव-धर्म मानणे हा ‘कम्फर्ट झोन’ आहे. तो सोडण्याची प्रेरणा मला गांधीजींकडून मिळाली, असेही कुलकर्णी यांनी नमूद केले. आपल्या चुकीच्या शिक्षणपद्धतीत प्रत्येक समस्येचे मूळ आहे. ही शिक्षणपद्धती अनेकांतून एक उत्तम विद्यार्थी शोधते, याउलट प्रत्येकात उत्तम काय आहे, हे शोधणार्‍या शिक्षणपद्धतीची गरज असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाला महापालिका आयुक्‍त तुकाराम मुंढे, ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.