Wed, Jul 24, 2019 15:07होमपेज › Nashik › तळघराचा अनधिकृत वापर करणार्‍यांवर होणार कारवाई 

तळघराचा अनधिकृत वापर करणार्‍यांवर होणार कारवाई 

Published On: May 12 2018 1:32AM | Last Updated: May 12 2018 1:32AMनाशिक : प्रतिनिधी

तळघर आणि टेरेसचा अनधिकृत वापर करणार्‍यांवर आता महापालिका कारवाई करणार आहे. यासंदर्भात महापालिकेने अशा प्रकारे गैरवापर करणारे हॉटेलचालक, गोदाम, दुकाने थाटलेल्यांना अंतिम नोटिसा बजावल्या असून, यासंदर्भातील अहवाल अतिक्रमण विभागाला सादर केला आहे. यामुळे येत्या काही दिवसांत संबंधितांवरील कारवाई अटळ मानली जात आहे. तळघराचा वापर मालमत्ताधारकांकडून विविध कारणांसाठी केला जात आहे. यामुळे हा वापरातील बदल टाळण्यासाठी ही कारवाई केली जाणार आहे. त्यात नाशिकरोडला 23 गोदामे, 11 हॉटेल, 41 दुकाने व चार इतर व्यवसाय थाटण्यात आले आहेत. नाशिक पूर्व विभागात 23 गोदामे, पाच हॉटेल, 32 दुकाने व इतर दहा व्यवसायांची दुकाने आहेत. सिडको व सातपूर विभागात पाच गोदामे, एक हॉटेल, तीन दुकाने व इतर चार दुकाने आहेत. नाशिक पश्‍चिम विभागात 16 गोदामे, दोन हॉटेल, 46 दुकाने व सहा इतर वापर सुरू आहे. 

तसेच पंचवटी विभागात 39 गोदामे, सहा हॉटेल, 30 दुकाने आणि 24 तळघरांमध्ये इतर व्यवसाय थाटण्यात येऊन अनधिकृत वापर केला जात असल्याचे नगररचना विभागाने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी यासंदर्भात नगररचना विभागाला सूचना केली होती. तसेच मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनीदेखील मागील महिन्यात शहरातील टेरेस व तळघरामंध्ये सुरू असलेल्या गैरवापराविषयी संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नगररचना विभागाने सर्वेक्षण पूर्ण करून त्यासंदर्भातील अहवाल अतिक्रमण विभागाच्या हवाली केला आहे. आता यापुढील कारवाई अतिक्रमण निर्मूलन विभागाला करावयाची आहे. 

शहरातील मध्यवस्तीत तर अनेक ठिकाणी पार्किंगच्या जागी तळघरात कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच विविध प्रकारचे व्यवसाय थाटण्यात आले आहेत. नागरिकांना पार्किंग करण्यासाठी जागा नसताना काही बांधकाम व्यावसायिक आणि मालमत्ताधारकांनी मात्र पार्किंगच्या जागी पैसा कमविण्याचा धंदा सुरू केला आहे. अनेक प्रकरणांमध्ये तर बांधकाम व्यावसायिकांनी तळघरात तसेच पार्किंगच्या जागी गाळे निर्माण करून त्यांची विक्रीदेखील केली आहे.