Tue, Nov 20, 2018 21:07होमपेज › Nashik › इंडिया बुल्स कंपनीवर जप्तीची कारवाई

इंडिया बुल्स कंपनीवर जप्तीची कारवाई

Published On: Mar 23 2018 1:59AM | Last Updated: Mar 23 2018 1:52AMसिन्‍नर : प्रतिनिधी

10 कोटी 40 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविल्याप्रकरणी गुळवंच ग्रामपंचायतीने इंडिया बुल्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्‍चर या कंपनीवर प्रातिनिधिक स्वरूपात जप्तीची कारवाई केली असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी अनिल कानवडे यांनी दिली.

इंडिया बुल्स या कंपनीने गुळवंच आणि मुसळगावच्या शिवारात एक हजार हेक्टर क्षेत्रावर विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) विकसित केले आहे. या ठिकाणचा औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाचे कामदेखील अंतिम टप्प्यात आहे. मात्र,  गेल्या काही वर्षांत प्रकल्प रखडला आहे. गुळवंच ग्रामपंचायतीने जून 2016 पासून प्रकल्पाच्या मालमत्तेवर घरपट्टी कर आकारणी सुरू केलेली आहे. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीने कर रूपात एक रुपयादेखील भरलेला नाही, असे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे. याबाबत वारंवार पत्रव्यवहार करून कर भरण्याबाबत सूचित करण्यात आले. मात्र, कंपनीने  प्रतिसाद दिला नाही. 
ग्रामपंचायतीने 17 मार्चला जप्ती वॉरंट बजावले होते. कर भरणा करण्यासाठी दि.21 मार्चपर्यंतची मुदतही देण्यात आली. इंडिया बुल्सने दाद दिली नसल्याने अखेर ग्रामपंचायतीने प्रातिनिधिक स्वरूपात झेरॉक्स मशीन जप्त करून इंडिया बुल्सला दणका दिला. 

दरम्यान, ग्रामविकास मंत्रालयाने 22 ऑगस्ट 2017 रोजी गुळवंच ग्रामपंचायतीला एका पत्राद्वारे विशेष आर्थिक क्षेत्रांना मालमत्ता करात कुठलीही सूट देण्यात आलेली नसल्याचे सूचित केलेले असल्यानेच ग्रामपंचायतीने जप्ती कारवाईचे पाऊल उचलले असल्याची माहिती सरपंच कविता सानप यांनी दिली.गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, विस्तार अधिकारी पी. एन. बिब्बे, बी. के. बिन्‍नर यांच्या मार्गदर्शनाखाली आदींनी एमआयडीसी पोलिसांच्या उपस्थितीत जप्तीची कारवाई केली.

Tags : Nashik, Nashik News, Action, seizure,  India Bulls Company