होमपेज › Nashik › रेशन दुकानदारांना हलगर्जी भोवणार

रेशन दुकानदारांना हलगर्जी भोवणार

Published On: Dec 04 2017 1:36AM | Last Updated: Dec 03 2017 11:28PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

महिन्याकाठी धान्य वितरण करताना जर  रेशन दुकानदारांनी कामचुकारपणा केला तर, त्याचा परिणाम दुकानदारांना सोसावा लागणार आहे. सलग दोन महिने शंभर टक्के धान्य वितरित न करणार्‍या दुकानांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय पुरवठा विभागाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी या महिन्यापासून सुरू झाली आहे.

स्वस्त धान्य वितरण प्रणालीमधील भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी पुरवठा विभागाने पीओएस (पॉइंट ऑॅफ सेल) मशीन्स जिल्ह्यातील दोन हजार 609 दुकानदारांना दिलेले आहेत. या मशीनच्या सहाय्याने बायोमेट्रिक थंब घेऊन लाभार्थ्यांना धान्याचे वाटप केले जाते. मात्र, त्यानंतरही अनेक तालुक्यांत शंभर टक्के धान्य वाटप होत नसल्याची बाब पुरवठा विभागाच्या निदर्शनास आली. त्यामुळेच पुरवठा विभागाने आता महिन्याला प्रत्येक तालुक्याचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातील धान्य वितरणची यादी महिन्याला तयार केली जाणार आहे. या यादीतील सर्वात शेवटच्या दहा दुकानदारांना धान्य वाटप पूर्ण का केले नाही याबाबत कारणे दाखवा नोटिसा बजावल्या जाणार आहे. 

अनेक तालुक्यांमध्ये दुकानदार हे त्यांच्या मर्जीप्रमाणे दुकाने सुरू ठेवतात. त्यामुळेच नागरिकांना धान्यासाठी वारंवार दुकानांमध्ये हेलपाटे मारावे लागतात. त्यातही दुकानदारांकडून धान्य अजून आले नाही, धान्य शिल्लक नाही, यंदा कमी धान्य आले पुढील महिन्यात वाढीव देतो अशी उत्तरे नागरिकांना दिली जातात. परिणामी लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागते. त्याबाबतच्या तक्रारीही पुरवठा विभागाकडे आलेल्या होत्या.

त्याची दखल घेत पुरवठा विभागाने आता नोटिसा बजावण्याची भूमिका घेतली आहे. पहिल्या महिन्यात धान्य वितरण कमी केल्याबद्दल कारणे दाखवा नोटिसा बजावलेल्या दुकानांना एक संधी दिली जाणार आहे. त्या दुकानदारांनी दुसर्‍या महिन्यात कमीतकमी 90 टक्के धान्य वितरण करणे आवश्यक आहे. मात्र, नोटिसीनंतरही दुकानदाराने वितरणात हलगर्जीपणा केल्यास थेट त्या दुकानाचा परवानाच रद्द केला जाणार आहे.