Fri, Jul 19, 2019 22:05होमपेज › Nashik › दहीपुलावरील अनधिकृत इमारतीवर मनपाची कारवाई

दहीपुलावरील अनधिकृत इमारतीवर मनपाची कारवाई

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 14 2018 10:58PMनाशिक : प्रतिनिधी

मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत सुरू असलेल्या मोहिमेंतर्गत आज (दि.14) दहीपूल येथील अनधिकृत इमारतीवर हातोडा चालविला. अचानकपणे ही कारवाई सुरू झाल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. बांधकाम हटविण्यास विरोध होऊनही मनपाने कारवाई करीत अनधिकृत बांधकाम करणार्‍यांना घाम फोडला आहे. 

मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे रुजू झाल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील मनपाच्या सहाही विभागांत दररोज अतिक्रमण मोहीम राबविली जात आहे. यामुळे अनधिकृत आणि अतिक्रमण करणारे हादरून गेले असून, अनेकांनी या मोहिमेचा धसका घेत स्वत:हूनच बांधकामे काढून घेतली आहेत. कानडे मारुती लेनमधील अनधिकृत इमारतीवरील कारवाईबाबत अनेक दिवसांपासून अतिक्रमण विभाग व नगररचना विभागाकडून कार्यवाही केली जात होती. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर बुधवारी (दि.14) दुपारी इमारतीच्या बांधकामावर बुलडोझर चालविण्यात आला. इमारतीत नऊ दुकाने व काही ऑफिसेस होते. हे सर्व दुकाने भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. विद्या सोनवणे आणि राजेश हरकूट हे या दोन मजली इमारतीचे मालक असून, इमारतीच्या बांधकामास नगररचना विभागाची परवानगी नव्हती. यामुळे नगररचना विभागाने मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्या होत्या.

अनधिकृत आरसीसी बांधकामे तोडून सुमारे दोन ट्रक लोखंडी अँगल, शटर, बोर्ड, पाइप इ. साहित्य जप्त करण्यात आलेले आहे. तसेच उर्वरित अनधिकृत बांधकाम तोडण्याकरिता किमान दोन दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. उपआयुक्‍त आर. एम. बहिरम यांच्या सूचनेप्रमाणे पश्‍चिम विभागीय अधिकारी नितीन नेर, पूर्व विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, सहायक अधीक्षक एस. एल. काळे, नगररचना विभागाचे अभियंता जितेंद्र चव्हाण, संजय खुळे, अतिक्रमण विभागाचे दोन पथके, एक जेसीबी, एक गॅस कटर व दैनंदिन अतिक्रमण निर्मूलन पोलीस बंदोबस्तासह अनधिकृत बांधकामे काढण्यात आली.  

मनपाच्या कारवाईस स्थगिती मिळावी यासाठी संबंधित मालमत्ताधारकांनी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता. परंतु, न्यायालयाने हा दावा फेटाळून लावल्याने मनपाने कारवाई केल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्‍त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली.