Tue, Mar 19, 2019 15:33होमपेज › Nashik › प्रदूषणमुक्‍तीसाठी मुदतबाह्य वाहनांवर बडगा

प्रदूषणमुक्‍तीसाठी मुदतबाह्य वाहनांवर बडगा

Published On: Jan 12 2018 1:55AM | Last Updated: Jan 11 2018 11:53PM

बुकमार्क करा
पंचवटी : वार्ताहर

स्मार्ट सिटीच्या द‍ृष्टीने प्रादेशिक परिवहन विभागाने पाउले उचलली असून, सार्वजनिक वाहतूक करणार्‍या वाहनांची वयोमर्यादा ठरविणे, नव्याने परमिट देणे, वाहनांवर जाहिरात करणे, प्रीपेड टॅक्सी सेवा सुरू करणे आदी महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली असून, वयोमर्यादा उलटलेल्या वाहनांवर जुलै महिन्यापासून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

टुरिस्ट कॅब यांना परवाने देणे, नूतनीकरण करणे अथवा न करण्याचे अधिकार यापूर्वी प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना होते. ते 21 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये शिथिल करून टुरिस्ट टॅक्सीची नोंदणी ज्या कार्यालयात केली जाईल, त्या कार्यालय प्रमुखांना देण्यात आले आहेत. ऑटोरिक्षाचे परवाने 1997 पासून बंद करून त्यावर मर्यादा आणली होती. मात्र, शहरात वाढणारी बेरोजगारी लक्षात घेता ही मर्यादा उठविण्यात आली आहे. त्यामुळे नवीन परवाने देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 

31 मार्चपर्यंत हे परवाने ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार आहे. यासाठी आतापर्यंत 1200 अर्ज प्राप्‍त झाले असून, 750 नागरिकांना परवानेदेखील देण्यात आले आहेत. कॅबधारकांना आपल्या वाहनांवर जाहिरात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शहरात वाढणारे प्रदूषण आणि इंधनावर होणारा खर्च लक्षात घेता बॅटरीवर चालणार्‍या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. याबाबत दोन वाहनांचे पासिंगदेखील करण्यात आली आहे. टुरिस्ट बस परवान्यासाठी पूर्वी मुंबई येथील परिवहन आयुक्‍त यांच्याकडे जावे लागत होते.

मात्र, आता नागरिकांना सुविधा देण्याच्या उद्देशाने टुरिस्ट बस परवाने देण्याचा व नाकारण्याचा अधिकार प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात आला आहे. वाहन चालविण्याचा बिल्ला नसणार्‍या चालकाकडे वाहन चालविण्यास देणार्‍या वाहनमालकावर यापुढे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे अपघात झाल्यास विमा प्रदान करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत. रिक्षाचालकांना पूर्वी आपले परवाने इतर जिल्ह्यांत नेणे शक्य नव्हते. मात्र, त्यात बदल करून ऑटोरिक्षा परवाने इतर जिल्ह्यांत स्थलांतरित करण्यास मुभा देण्यात आली आहे.

शहरातील वाढती वाहनसंख्या, तसेच प्रवाशांना देण्यात येणार्‍या सुविधा, वाढते प्रदूषण लक्षात घेता कुलकॅब चालविणार्‍या वाहनांना मूळ नोंदणी दिनांकापासून टॅक्सीसाठी 12 वर्षे, ऑटोरिक्षासाठी 20 वर्षे, टुरिस्ट कॅबसाठी नऊ वर्षे वाहन वयोमर्यादा ठरविण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 जानेवारीपासून लागू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना चांगल्या वाहनांतून प्रवास करणे शक्य होणार आहे. 

शहरातील प्रदूषण कमी होणार आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकात इतर राज्यांतील आणि जिल्ह्यांतील भाविक आणि प्रवाशांंची संख्या लक्षात घेता त्यांना ऐच्छिक स्थळी जाण्यासाठी कोणतीही फसवणूक होऊ नये, यासाठी प्रीपेड ऑटोरिक्षाच्या धर्तीवर प्रीपेड टॅक्सी सेवा केंद्राची सुरुवात प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिकरोड ते शिर्डी, मनमाड, त्रंबकेश्‍वर, सप्‍तशृंगगड, सापुतारा, सिन्‍नर, इगतपुरी, शनी शिंगणापूर या ठिकाणी जाणे सोपे होणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता स्कूल व्हॅनसाठी देण्यात येणारे परवाने हे फक्‍त नव्या वाहनांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे अपघातांची संख्यादेखील कमी होणार आहे. यापुढे स्कूल बस या संपूर्णपणे पिवळ्या रंगात धावताना दिसतील. यापूर्वी नाशिक शहरात फक्‍त 300 स्कूलबस धावत होत्या, त्यांची संख्या 1800 च्या घरात असून, ती वाढवून तीन हजारांच्या घरात नेण्याचे प्रादेशिक परिवहन विभागाचे लक्ष्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच, स्मार्ट सिटीच्या उद्देशाने स्थापन केलेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. राहणार असून सचिवपदी प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर राहणार आहेत. पोलीस उपायुक्‍त (वाहतूक) लक्ष्मीकांत पाटील आणि एक अशासकीय सदस्याचीही या समितीवर नेमणूक केली जाणार आहे.

तीन हजार रिक्षा, 325 टॅक्सींना फटका

नवीन निर्णयामुळे तीन हजार ऑटोरिक्षा आणि 325 टॅक्सींना याचा फटका बसणार आहे. तर नव्याने ऑटोरिक्षाचे परवाने देणे सुरू केल्याने शहरातील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच, शहरातील प्रदूषण कमी होऊन स्मार्ट सिटीकडे वाटचाल करण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच, येत्या महिनाभरात मध्यवर्ती बसस्थानक आणि नाशिकरोड येथून ई-मीटरप्रमाणे भाडे आकारणीस सुरुवात होणार आहे. त्यानंतर महामार्ग बसस्थानक येथेदेखील ई-मीटर पद्धत लागू करण्यात येणार आहे. यामध्ये शेअर आणि स्पेशल या दोन्ही सुविधा उपलब्ध राहणार आहेत.