Wed, Jul 17, 2019 12:08होमपेज › Nashik › मनपा शिक्षण मंडळाचे पाच शिक्षक बडतर्फ

मनपा शिक्षण मंडळाचे पाच शिक्षक बडतर्फ

Published On: Jul 10 2018 1:03AM | Last Updated: Jul 09 2018 11:06PMनाशिक : प्रतिनिधी

विभागीय चौकशीमध्ये मनपा शिक्षण मंडळाचे पाच शिक्षक दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. चौकशी समितीच्या अहवालात  संबंधित शिक्षकांवर दोषारोप सिद्ध होऊन पाचही शिक्षकांंना बडतर्फीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. इतर तीन शिक्षकांची चौकशीसंदर्भातील कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. 

मनपा प्रशासनाच्या या कारवाईमुळे मनपा शिक्षण मंडळाच्या शाळांमधील शिक्षकांचे अनेक कारनामे उघड झाले आहेत. मागील महिन्यात मनपा शाळांच्या आठ शिक्षकांची विभागीय चौकशी सेवानिवृत्त अधिकारी बाबूराव हांगे यांच्यामार्फत करण्यात आली. त्यात प्रथमदर्शनी शिक्षक दोषी आढळले. आडगाव येथील शिक्षक मुरलीधर भोर यांच्यावर विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.

हिरामण बागूल यांना अफरातफर प्रकरणात अटक झाली होती. शैलजा मानकर यांनी दाखल्यासाठी लाच घेतल्याचा ठपका होता. लता महारू गरड रजेवर असताना हजेरी पटावर स्वाक्षरी करत होत्या. या पाचही शिक्षकांची चौकशी होऊन त्यात त्यांच्यावर दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, प्रशासनाने संबंधितांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेत तशी नोटीस पाठविली आहे. तर छाया गोसावी यांनी शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी लाच घेतल्याचा आरोप होता. बोगस पदवी सादर करून पदोन्नती घेतल्याप्रकरणी मुख्याध्यापिका जयश्री पंगुळवाडे यांना निलंबित करण्यात आले आहे. 

या कारणामुळे झाली कारवाई

विजया भोसले यांच्यावर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत घोटाळा केल्याचा तर ज्ञानदेव पगार यांना कर्ज काढून देण्याच्या प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. विभागीय चौकशीत आठपैकी पाच शिक्षकांवर बडतर्फीची कारवाई करण्याची शिफारस केली होती. त्यावर प्रशासनाने अहवालाची पडताळणी करत ज्ञानदेव पगार, मुरलीधर भोर, शैलजा मानकर, हिरामण बागूल आणि लता गरड यांच्यावर बडतर्फीची कारवाई करत अंतिम नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.