होमपेज › Nashik › ई-पॉसद्वारे खतांची विक्री न केल्यास कारवाई

ई-पॉसद्वारे खतांची विक्री न केल्यास कारवाई

Published On: Jun 09 2018 1:35AM | Last Updated: Jun 08 2018 11:44PMमालेगाव : वार्ताहर

खरीप हंगामासाठी मुबलक प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध झाली आहेत. दुकानदारांनी इ-पॉस मशिनद्वारे व छापील किंमतीपेक्षा जादा दराने खते विक्री केल्याचे आढळल्यास दुकानदारांचा परवाना रद्द करण्याचा इशारा तालुका कृषी अधिकारी गोकुळ आहिरे व पंचायत समितीचे कृषी अधिकारी भास्कर जाधव यांनी दिला आहे.

खरीप हंगामात शेतकर्‍यांना रासायनिक खताची टंचाई जाणवू नये, यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. यंदा शासनाकडे 23 हजार 850 मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी नोंदवण्यात आली होती. त्याअंतर्गत तालुक्यासाठी मुबलक प्रमाणात खते उपलब्ध झाली आहेत. शेतकर्‍यांनी बी-बियाणे घेताना काळजी घ्यायची असून, फेरीवाले अथवा विनापरवानाधारक दुकानामधून बियाणे घेऊ नये. शेतकर्‍यांनी एकाच वाणाची मागणी न करता इतर चांगले बियाणे बाजारात उपलब्ध आहेत. त्याची पेरणी करावी. परंतु हे करत असताना शेतकर्‍यांनी दुकानदाराकडून स्वत:च्या नावाचे पक्के बिल घ्यावे व ते सांभाळून ठेवावे, असे आवाहनही तालुका कृषी अधिकारी आहिरे व पंचायत समितीचे कृषी अधिकारी जाधव यांनी केले आहे.

भरारीपथकाकडे तक्रार

शेतकर्‍यांच्या मागणीप्रमाणे कृषी विभागाने खते उपलब्ध करून दिली आहेत. ही खते शेतकर्‍यांना योग्य भावात मिळतात की नाहीत, यावर देखरेख ठेवण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. या भरारीपथकाचे अध्यक्ष तालुका कृषी अधिकारी गोकुळ आहिरे असून  पंचायत समितीचे कृषी अधिकारी बी. पी. जाधव, वजनमापे निरीक्षक व्ही. पी. मुंडे, मंडळ कृषी अधिकारी ए. टी. शिंदे हे सदस्य तर एन. व्ही. सोयगावकर हे  सचिव म्हणून काम पाहणार आहेत. 

आधार क्रमांक सक्तीचा

रासायनिक खतांचा काळाबाजार थांबविण्यासाठी शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शेतकर्‍यांना आधारकार्ड सक्तीचे केले आहे. खताची खरेदी करताना शेतकर्‍यांनी आधार नंबर बरोबर आणावा, तरच खते मिळणार आहेत. अन्यथा खते मिळणार नाही. त्यासाठी ई-पॉस यंत्रणा राबवली जात आहे.