Fri, Apr 26, 2019 01:23होमपेज › Nashik › जुगार्‍यांवर कारवाईचा धडाका

जुगार्‍यांवर कारवाईचा धडाका

Published On: Sep 10 2018 1:17AM | Last Updated: Sep 09 2018 10:42PMनाशिक : प्रतिनिधी

पोलिसांनी जुगार्‍यांविरोधातील कारवाई वाढवली असून, गत नऊ दिवसांत 68 जुगार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या जुगार्‍यांकडून पोलिसांनी 83 हजार 465 रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्‍त केले आहे. 

गत दहा दिवसांत शहरात सार्वजनिक ठिकाणी, मैदानांवर किंवा पडिक जागेत जुगार खेळणार्‍या जुगार्‍यांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईला वेग देण्यात आला असून, जास्तीत जास्त जुगारी पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या दहा दिवसांच्या कालावधीत पोलिसांनी जुगार्‍यांविरोधात 16 गुन्हे दाखल केले आहेत. त्यात सर्वाधिक 4 गुन्हे नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. त्याखालोखाल पंचवटी पोलीस ठाण्यात 3 गुन्हे दाखल आहेत. 

अंदर बाहर, तिरट, मटका, सोरट, हारजित, मिलन टाइम आदी प्रकारचे जुगार खेळत पैसे कमवण्याचा जुगार्‍यांचा प्रयत्न असतो. त्यात अनेकदा वाद, हाणामार्‍या होत असतात. तसेच, सार्वजनिक शांतता भंग होत असते. त्यामुळे पोलिसांकडून जुगार्‍यांवर कारवाई केली जात असते. तरीदेखील जुगारी पोलिसांपासून लपून छपून जुगार खेळत असतात. अवघ्या तीन दिवसांपासून सुरु होणार्‍या गणेशोत्सवातही नालच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल जुगारातून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी जुगार्‍यांवर अंकुश ठेवण्यासाठी कारवाई वाढवली आहे. अंबड पोलिसांनी रविवारी (दि.9) मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेल रॉयल इन येथे छापा टाकून 11 जुगार्‍यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 56 हजार रुपयांची रोकड आणि दोन आलिशान चारचाकी असा 11 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. तसेच जुगार खेळू दिला म्हणून हॉटेलच्या व्यवस्थापकाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांसमोर आव्हान

पोलिसांकडून मोकळ्या मैदानात, पडिक इमारतीत किंवा अंधारात जुगार खेळणार्‍या जुगार्‍यांविरोधात कारवाई केली जात असली तरी जुगार अड्डे सुरु असल्याचे चित्र शहरातील काही ठिकाणी आहे. या जुगार अड्ड्यांवर सर्रासपणे अनेक सराइत जुगारी जुगार खेळत असतात मात्र पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. त्याचप्रमाणे आता ऑनलाइन जुगारामुळे जुगार्‍यांवर कारवाई करणेही पोलिसांसाठी एक आव्हान झाले आहे.