Tue, Jun 25, 2019 13:09होमपेज › Nashik › रुग्णांच्या जिवाशी खेळणारा बंगालीबाबा सुरगाण्यात अटकेत

रुग्णांच्या जिवाशी खेळणारा बंगालीबाबा सुरगाण्यात अटकेत

Published On: Mar 17 2018 1:14AM | Last Updated: Mar 17 2018 12:20AMसुरगाणा : वार्ताहर

तालुक्यात बोगस डॉक्टर विरोधात कारवाई आणि शोध मोहिमेला  प्रारंभ झाला आहे. येथे तेली गल्लीत  अनेक वर्षापासून वैद्यकीय पदविका  नसताना आदिवासी जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत आणि त्यांच्या जिवाशी खेळत वैद्यकीय उपचार करणारा  बंगालीबाबा होता. त्याच्यावर  तालुका  वैद्यकीय अधिकार्‍याने कारवाई करीत, पोलिसांच्या ताब्यात दिले. 

वैद्यकीय अधिकारी हर्षल नेहते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी बंगालीबाबाला ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे. अधिक माहिती अशी की, तेली गल्लीत डॉ. सचिन संतोष बाला हा बंगालीबाबा अनेक वर्षापासून  वैद्यकीय व्यवसाय करीत होता याची खबर  तालुका वैद्यकीय अधिकारी नेहते यांना मिळाली होती. तक्रारीनुसार त्यांनी बोगस डॉक्टर शोध मोहीम हाती घेतली.पथकासह त्यांनी अचानक बाला याच्या दुकानावर छापा टाकून तपासणी केली.

वैद्यकीय उपचार करणार्‍या बाला यांच्याकडे डॉक्टर बॅचलर ऑफ अल्टरनेटिव्ह हे मेडिकल सर्टिफिकेट आढळले. या डॉक्टरला अ‍ॅलोपॅथिक प्रॅक्टिस करण्याची परवानगी नसताना त्याच्याकडे अ‍ॅलोपॅथीची औषधे आढळून आली. ती औषध पथकाने हस्तगत केली. बाला याला सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. माने यांनी ताब्यात घेतले. 

दरम्यान, तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांनी सर्व शहानिशा करूनच संबंधित डॉक्टर विरोधात कारवाईची मागणी केली होती . मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदविताना बाला याला दोन दिवसात वैद्यकीय पेशाचे कागदपत्रे सादर करण्याची मुदत देत कारवाईला खो दिला. त्यामुळे पोलिसांची भूमिका नेमके काय आहे, अशी चर्चा परिसरात सुरु आहे.

Tags : nashik, nashik news, Surgana taluka, bogus doctor,