Tue, Jun 18, 2019 20:19होमपेज › Nashik › आमदार झिरवाळांसह अधिकार्‍यांना डांबले

आमदार झिरवाळांसह अधिकार्‍यांना डांबले

Published On: Apr 17 2018 1:52AM | Last Updated: Apr 17 2018 1:52AMवणी : वार्ताहर

विविध प्रलंबित मागण्यांसह पाणीप्रश्‍नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत देवसाने येथील ग्रामस्थांनी पाहणीसाठी आलेल्या आमदार नरहरी झिरवाळ यांच्यासह पंचायत समिती सभापती एकनाथ गायकवाड, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना मंदिरात डांबून ठेवले.राज्यातील लक्षवेधी प्रकल्प असलेल्या मांजरपाडा वळण योजनेचे काम सुरू होऊन सुमारे आठ वर्षांचा काळ लोटला आहे. परंतु या प्रकरणी देवसाने ग्रामपंचायतीने दिलेल्या निवेदनानुसार प्रकल्पाचे काम सुरू करताना झालेल्या बैठकीत तत्कालीन जलसंपदामंत्र्यांनी स्थानिक वापरासाठी 14.70 टक्के पाणीसाठा शिल्लक ठेवू, असे आश्‍वासन दिले होते.

तसेच सदरचे पाणी चालू प्रकल्पात राहू शकत नसल्याने स्वतंत्र साठे निर्माण करण्यात येतील व त्याची मंजुरी मांजरपाडा प्रकल्पांतर्गतच देण्यात येईल, असे आश्‍वासनही दिले होते. परंतु या प्रकल्पाबाबत कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. तसेच संबंधित अधिकारी दिशाभूल करत असल्याचा आरोप देवसाने ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात तत्काळ बैठक होऊन निर्णय न झाल्यास काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दहा दिवसांपूर्वी दिला होता. त्याच पाश्‍वर्भूमीवर सोमवारी (दि.16) कामाची पाहणी करण्यासाठी गेलेले दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ, पंचायत समिती सभापती एकनाथ गायकवाड,  लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संगानिया, शाखा अभियंता प्रकाश पठाडे आदींना देवसाने गाव परिसरातील ग्रामथांनी देवसाने गावातील मंदिरात डांबून ठेवले. या आंदोलनाची माहिती मिळताच  दिंडोरीचे तहसीलदार बाबासाहेब गाढवे, सहय्यक पोलीस निरीक्षक रंगनाथ सानप आदींनी पथकासह देवसाने येेथे धाव घेतली.

यानंतर अधिकारी व लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांच्या मागण्या ऐकून घेतल्या. शेवटी लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गिरीश संघानिया यांनी स्थानिकांचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी चारणवाडी धरण बांधणी संदर्भात तत्काळ वरिष्ठ स्तरावर बैठक आयोजित करण्याचे आश्‍वासन दिले. तसेच बैठक होईपर्यंत मांजरपाडाचे काम बंद ठेवण्यात येईल. या प्रकल्पाचे नाव बदलून ते देवसाने प्रकल्प ठेवण्याचा प्रस्ताव तयार करून शासन स्तरावर पाठवण्यात येईल.  लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आमदार, सभापतींसह अधिकार्‍यांची सुटका करण्यात आली.

Tags : Nashik, Accused, ignoring, water, disputes, various, pending, demands