Mon, Mar 25, 2019 09:08होमपेज › Nashik › कालबद्ध पदोन्नती, लेखापरीक्षणातही दुर्लक्ष 

कालबद्ध पदोन्नती, लेखापरीक्षणातही दुर्लक्ष 

Published On: Feb 14 2018 1:56AM | Last Updated: Feb 13 2018 10:57PMनाशिक : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील जवळपास दोनशे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतरही कालबद्ध पदोन्नतीपासून वंचित राहण्यासाठी ‘लक्ष्मीदर्शन’ हेच कारण असल्याचे समोर आल्यानंतर स्थानिक लेखा निधी शाखा असो की विभागीय आयुक्त कार्यालयस्तरावरून दरम्यानच्या काळात झालेल्या लेखापरीक्षणातही पदोन्नतीच्या मुद्यावर आक्षेप नोंदविण्यात न आल्याने संशयाचे धुके दाटले आहे. लक्ष्मीदर्शनाने नेमके कोणकोणाचे डोळे दिपले, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

वर्ग तीन आणि चारमधील कर्मचार्‍यांना सेवेत रुजू झाल्यानंतर बारा वर्षांनी पहिली तर नंतरच्या बारा वर्षांनी दुसरी कालबद्ध पदोन्नती दिली जाते. वेतनात एक ते दीड हजार रुपयांची वाढ होत असल्याने संबंधित कर्मचार्‍यांना सेवानिवृत्तीनंतर खर्‍या अर्थाने या पदोन्नतीचा लाभ होत असतो. दोनशे कर्मचार्‍यांना मात्र सेवानिवृत्तीनंतरही या पदोन्नतीचा लाभ मिळू शकला नसल्याचे वास्तव समोर आले आहे. पदोन्नतीचा लाभ मिळविण्यासाठी संबंधित कर्मचार्‍यांचा गोपनीय अहवाल सादर करणे महत्त्वाचे आहे. पण, गोपनीय अहवाल लिहिणार्‍या अधिकार्‍यांनी या कामी  अडवणूक केल्याचे बोलले जाते.  दोनशे कर्मचार्‍यांचा पदोन्नती न मिळण्यामागे हे एक प्रमुख कारण आहे. तसेच लक्ष्मीदर्शनाने डोळे दिपल्याने संघटनेच्या काही पदाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांना हाताशी धरीत या कर्मचार्‍यांच्या नावाची शिफारस जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडे केली. दुसरीकडे लक्ष्मीदर्शनात कमी पडलेल्यांना मात्र पदोन्नत्तीपासून सोयीस्कररीत्या वंचित ठेवण्यात आले. अधिकारी आणि संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी संगनमत केले; पण दरवर्षी होणार्‍या लेखापरीक्षणातही पदोन्नतीतील काळेबेरे लक्षात न आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

पदोन्नती दिली गेली असती तर सेवापुस्तकात नोंद झाली असती. अर्थात सेवापुस्तकात कर्मचार्‍यांच्या सेवेसंंबंधी सर्वच प्रकारची माहिती सेवापुस्तकात नमूद केली जाते.  दोनशे कर्मचार्‍यांच्या सेवापुस्तकात तशी नोंदच नव्हती. तरीही जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त विभागाने केलेल्या लेखापरीक्षणात मात्र पदोन्नतीत डावलण्यात आलेल्या कर्मचार्‍यांचा मुद्दा निदर्शनास आला नाही, हे विशेष! या विभागाला नाहीच नाही. पण, स्थानिक लेखा निधी शाखा तसेच विभागीय महसूल आयुक्त कार्यालयानेही केलेल्या लेखापरीक्षणात पदोन्नतीचा मुद्दा समोर न आल्याने संशयाचे धुके दाटले आहे. आक्षेप नोंदविण्यात न आल्याने लक्ष्मीदर्शनाने सगळ्यांचेच डोळे दिपले गेल्याचा अर्थ  काढला जात आहे.