Mon, Jun 24, 2019 21:03होमपेज › Nashik › चांदवडजवळ अपघात; दोन ठार; तीन गंभीर

चांदवडजवळ अपघात; दोन ठार; तीन गंभीर

Published On: Aug 03 2018 1:36AM | Last Updated: Aug 02 2018 11:00PMचांदवड : वार्ताहर 

राहुड येथेे राष्ट्रीय महामार्गावर नाशिकहून मालेगावकडे वेगाने जाणार्‍या कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात कारने चार-पाच पलटी खाल्ल्या. या अपघातात गाडीतील दोन महिला गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्या. तर गाडीतील इतर तीन जण गंभीर जखमी झाले. अपघातातील सर्व जण मालेगाव तालुक्यातील सोयगाव येथील एकाच कुटुंबातील सदस्य आहेत.

याबाबत चांदवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मालेगाव तालुक्यातील सोयगाव येथील सचिन जोशी यांच्या आईचा दशक्रिया विधी कार्यक्रम नाशिक येथे गुरुवारी (दि.2) होता. दशक्रिया विधीचा कार्यक्रम आटोपून अश्‍विनी सचिन जोशी (35), शैला दिलीप जोशी (50), दिलीप गोविंद जोशी (58), मनीषा स्वप्नील जोशी (37), वेदांत दिलीप जोशी (20) हे पाच जण टाटा टियागो कारने (क्र. एम. एच. 41, ए. एस. 1596) नाशिककडून मालेगावला चालले होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास राहुड गावाच्या परिसरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील वळणाचा कारचालक वेदांत जोशी याचे गाडीवरील नियंत्रण सुटले, गाडी महामार्ग सोडून खाली उतरली. वेगात असलेल्या गाडीने चार- पाच पलटी खाल्ल्या.

या भीषण अपघातात गाडीतील अश्‍विनी सचिन जोशी व शैला दिलीप जोशी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर गाडीतील इतर दिलीप जोशी, मनीषा जोशी, वेदांत जोशी या तिघांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नाशिक येथेे हलविण्यात आले आहे. 
घटनेची माहिती मिळताच चांदवडचे पोलीस निरीक्षक संजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी, मुज्जमील देशमुख, चंद्रकांत निकम, गोसावी यांनी पंचनामा केला.

अपघातात सापडलेल्या व्यक्‍तींच्या नातेवाईकांनी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. यावेळी मालेगावचे नगरसेवक नीलेश आहेर, माजी गटनेते मनोहर बच्छाव, विजय पोफळे, नितीन पोफळे, सुशील पलोड, प्रवीण हेडा, वर्धमान पांडे आदींनी घटनास्थळी पोहचून जखमींची चौकशी करून नातेवाईकांना धीर दिला.