Mon, Jul 13, 2020 22:09होमपेज › Nashik › स्टेअरिंग लॉक झाल्याने अपघात 

स्टेअरिंग लॉक झाल्याने अपघात 

Published On: Jun 13 2019 1:35AM | Last Updated: Jun 13 2019 1:35AM
नाशिक : प्रतिनिधी

नाशिकहून चारधाम यात्रेसाठी गेलेल्या भाविकांच्या बसचा मध्य प्रदेश येथील विदिशा येथे अपघात झाल्याने नाशिकच्या चार भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.11) रात्री नऊच्या सुमारास घडली. बसचे स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. तसेच 18 भाविक जखमी झाले असून, त्यांच्यावर भोपाळ येथे उपचार सुरू आहेत. 

पिंपळगाव खांब येथील सर्वज्ञ ट्रॅव्हल्सच्या वतीने दरवर्षी केदारनाथ, बद्रीनाथसह चारधाम यात्रेचे आयोजन करण्यात येते. या यात्रेसाठी यावर्षी जिल्ह्यातील 50 हून अधिक भाविक ट्रॅव्हल्स बसेसमधून चार दिवसांपूर्वी यात्रेला रवाना झाले आहेत. पिंपळगाव, शिंदे, सय्यदप्रिंपी, गंगापूर रोड, इंदिरानगर, शेवगेडांग आदी परिसरातील रहिवासी या यात्रेत सहभागी झाले आहेत. मंगळवारी सायंकाळी ओंकारेश्‍वर येथील दर्शन घेत भाविकांची बस पुढील प्रवासास निघाली होती. मंगळवारी (दि.11) रात्री नऊच्या सुमारास विदिशा येथे ट्रॅव्हल बसचे स्टेअरिंग लॉक झाले. वेगात असलेल्या बसवर चालकास नियंत्रण मिळवता न आल्याने बस उलटली.

या अपघातात सुनंदाबाई ऊर्फसविता भगवंत ढिकले (55 रा. सय्यदप्रिंपी), दशरथ काशीनाथ जाधव (64, रा. शिंदे), शिवाजी पांडुरंग बोराडे (40,  रा. पिंपळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. तर उपचार सुरू असताना मंदाबाई अशोक केदारे (55, रा. शेवगेडांग, ता. इगतपुरी) या महिलेचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅव्हल्सचालक फरार झाला. या अपघातात सात ते आठ भाविक गंभीर जखमी झाले. स्थानिक पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत जखमी भाविकांना भोपाळ येथील रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या अपघाताची माहिती समजताच भाविकांचे नातलग नाशिकहून मध्य प्रदेश येथे गेले आहेत. मध्य प्रदेश सरकारच्या वतीने मृतांच्या नातेवाइकांना चार लाख तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. चार जखमींना नाशिकला आणले असून, इतर जखमींनाही रात्री उशिरापर्यंत नाशिकला आणण्यात येईल.