Fri, Jul 19, 2019 22:41होमपेज › Nashik › वृक्षलागवड अन् तोडीचे अर्ज ऑनलाइनच स्वीकारणार

वृक्षलागवड अन् तोडीचे अर्ज ऑनलाइनच स्वीकारणार

Published On: Jun 17 2018 1:36AM | Last Updated: Jun 16 2018 11:48PMनाशिक : प्रतिनिधी

महापालिकेने दीड वर्षापासून सुरू केलेल्या वृक्षगणनेत एकूण 256 प्रकारच्या प्रजाती आढळून आल्या असून, त्यातील 70 वृक्षांच्या प्रजाती या दुर्मीळ व कमी प्रमाणात आढळून येणार्‍या वृक्षांच्या आहेत. वृक्षगणनेत एकूण 47 लाख 95 हजार 387 वृक्ष आढळून आले आहेत. वृक्षगणनेची संपूर्ण माहिती मनपाच्या संकेतस्थळावर तसेच मोबाइल अ‍ॅपद्वारे डिजिटाइज करण्यात आल्याने वृक्षलागवड अथवा वृक्षांच्या फांद्यांच्या छाटणीबाबतचे अर्ज आता डिजिटाइज पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याचे मनपाने कळविले आहे.  

मनपाने 2016 मध्ये वृक्षगणनेचे काम हाती घेतले होते. आतापर्यंत 96 टक्के गणनेचे काम पूर्ण झाले आहे. एकूण वृक्षगणनेपैकी 56 टक्के वृक्ष शासकीय जागेत, तर 44 टक्के वृक्ष खासगी व इतर जागेत आढळून आले आहेत. वृक्षगणनेची माहिती नागरिकांसाठी ऑनलाइन स्वरूपात मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. संपूर्ण वृक्षगणना ही जीपीएस बेस्ड कार्यप्रणालीद्वारे करण्यात आली आहे. तसेच गणना करताना वृक्षांची माहिती अत्याधुनिक पद्धतीने मोबाइल अ‍ॅपद्वारे डिजिटाइज करण्यात आली असून, सर्व वृक्षांची माहिती जीओ रेफरन्स पद्धतीने नकाशावर उपलब्ध आहे.

वृक्षगणनेत 27 लाख 10 हजार 467 वृक्ष सरकारी जागेवर तर 20 लाख 84 हजार 920 वृक्ष हे खासगी तसेच इतर जागेवर आढळून आले आहेत. 2016 मध्ये मनपाने देशी जातीच्या 10 फूट उंचीच्या 21 हजार वृक्षांची लागवड केली होती. त्यापैकी 17 हजार 500 वृक्षांची एक वर्ष तर उर्वरित साडेतीन हजार वृक्षांची ठेकेदाराकडून पाच वर्षे देखभाल केली जाणार आहे. वृक्षलागवडीत कदंब, बकुळ, वड, पिंपळ, जंगली बदाम, कडुनिंब, पायर, करंज, सप्तपर्णी, मुचकुंद, कांचन या प्रजातींचा समावेश आहे. 

वनोद्यानांचा विकास 

केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत हरित क्षेत्र विकास करणे या प्रकल्पांंतर्गत मनपा हद्दीतील पंचक शिवारात आरक्षित जागेत वनोद्यान विकसित करण्यात आले आहे. त्यात फळझाडे, औषधी गुणधर्म असलेली एकूण साडेचार हजार वृक्षांची लागवड पूर्ण झाली आहे. तसेच याच अभियानातून मखमलाबाद शिवारातील तवली फाटा येथे साडेसतरा एकर जागेत 11 हजार वृक्षांची लागवड केली आहे. त्यात फळझाडे, दुर्मीळ रोपे व जंगली वेली यांची सुमारे साडेचार हजार वृक्ष आहेत. तसेच पक्ष्यांसाठी 200 घरटी लावण्यात आली असून, त्यांच्या पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आली आहे.

बारा हजार वृक्षलागवड 

यावर्षी महापालिका 12 हजार वृक्षलागवड करणार आहे. त्यासाठी खड्डे खोदण्याचे काम पूर्ण झाले असून, त्याची नोंदणी हरितसेना संकेतस्थळावर झाली आहे. खुल्या जागा, शाळा, रुग्णालये, रस्त्याच्या दुतर्फा व गोदावरी नदीलगत मनपाच्या जागेवर वृक्षलागवड केली जाणार आहे. एकूण 54 ठिकाणी 59.17 हेक्टर क्षेत्रावर ही लागवड केली जाईल. 2016 मध्ये 3068 तर 2017 मध्ये 5166 वृक्षांची लागवड करण्यात आली होती. दोन्ही वर्षांतील एकूण साडेसहा हजार वृक्ष सुस्थितीत आहेत.