नाशिक : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांनी राष्ट्रनिर्मिती करताना रयतेच्या मनात निर्माण केलेली राष्ट्रीयत्वाची भावना सध्या समाजातून लोप पावत असून, शिवरायांच्या नावाचा वापर करून राजकारणी सत्तेचा उपभोग घेत आहे. याला सर्वस्वी समाज जबाबदार असल्याची टीका शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केली.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे रविवार कारंजा येथील वडांगळीकर स्वामी मठात आयोजित सभेत ते बोलत होते. देशातील वाढते बलात्कार, राज्यातील वाढते दारू विक्रीचे प्रमाण तसेच लहान-सहान गोष्टींसाठी इतर देशांवर अवलंबून राहण्याची वृत्ती यांचा समाचार त्यांनी यावेळी घेतला. श्री शिवप्रतिष्ठान सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापन संकल्पपूर्तीच्या आवाहनासाठी भिडे गुरुजींची ही सभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी भिडे गुरुजी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या बाराव्या वर्षी हिंदुराष्ट्र स्थापण्याची शपथ घेतली. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर स्वकियांसह परकियांशी संघर्ष केला. शिवरायांना तब्बल 200 लढाया स्वकियांशी लढाव्या लागल्या. मात्र, महाराजांच्या याच राष्ट्रात आज त्यांचा उपयोग केवळ सत्ता मिळवण्यासाठी केला जात आहे. स्वार्थापोटी महाराजांच्या तीन-तीन जयंत्या साजरी केल्या जात असताना, महाराजांच्या मूळ विचारांना फाटा देण्याचे काम राजकारणी करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. देशात विकसित राज्य म्हणून मिरविणार्या महाराष्ट्रात 1 कोटी 64 लाख लिटर दारू रोज रिचवली जात आहे. राज्याची ओळख दारुड्यांचे राज्य अशी झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केल्या जाणार्या या देशात माता-भगिनींवर दिवसाढवळ्या बलात्कार होत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी कोणीही पुढे येत नसून, समाज षंढ झाल्याचे ते म्हणाले. या घटना रोखण्यासाठी यापुढे काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, 123 कोटींची लोकसंख्या असलेल्या हिंदुस्थानावर आजपर्यंत परकियांनीच राज्य केले आहे. आजही देशाची परिस्थिती म्हणजे दार-खिडक्या नसलेले घर अशी आहे. त्यामुळेच रोहिंग्या मुस्लिमांसारखे लोक येथे येऊन सुखाने नांदत आहेत. आजही मोबाइल फोनपासून ते इतर छोट्या-मोठ्या वस्तूंसाठी जगातील इतर देशांवर अवलंबून राहण्याची वेळ हिंदुस्थानावर आली आहे. ही परिस्थिती बदलून छत्रपती शिवाजी महाराज यांना अपेक्षित हिंदुराष्ट्राची निर्मिती करायची असल्यास समाजात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्याची गरज भिडे यांनी व्यक्त केली. त्याची सुरवात स्वत:पासून करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना देशाप्रति भक्ती व निष्ठेची शपथ दिली.
गोहत्या थांबविणे गरजेचे : देशात 146 सरकारमान्य कत्तलखाने आहेत. जगात सर्वाधिक चामडे निर्यात करणार देश म्हणजे हिंदुस्थान आहे. त्यासाठी दररोज 46 हजार गायींची कत्तल केली जात आहे. त्यापेक्षा अधिक पटीने बोकड, म्हशी तसेच बैलांची कत्तल केली जात असून, ती थांबविण्याची गरज आहे. त्यासाठी नुसता कागदावर कायदा तयार करून चालणार नाही, तर त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे भिडे यांनी सांगितले.
उद्याचा पंतप्रधान आयात : हिंदुस्थानवर आजपर्यंत परकियांनीच सत्ता केली आहे. भावी पंतप्रधानही बाहेरूनच आयात केलेले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील एक महत्त्वाचा पक्ष काम करत असल्याचे सांगत भिडे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्र सोडले. हे भावी पंतप्रधान ज्या पक्षाचे नेतृत्व करत आहेत, त्या पक्षाचे कार्यकर्ते आम्ही राष्ट्रवादी असल्याचा प्रचार-प्रसार करतात, असे सांगत त्यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.
नाशिकमध्ये फाइव्हस्टार संस्कृती रुजतेय : धार्मिक महत्त्व असलेल्या नाशिकसारख्या शहरात थ्री-स्टार, फाइव्ह स्टार संस्कृती रुजत असल्याबद्दल भिडे यांनी चिंता व्यक्त केली. जगाने अनुभव घेतलेली व नंतर नाकारलेली संस्कृती आपण भारतीय स्वीकारत आहोत, ही चिंताजनक बाब असल्याचे ते म्हणाले.
निधी संकलनासाठी तुकड्या : छत्रपती शिवाजी महाराज यांचे सोन्याचे सिंहासन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने तयार करण्याच्या संकल्प केला आहे. या सिंहासनासाठी लागणार्या निधीच्या संकलनासाठी जिल्ह्याच्या पंधरा तालुक्यांमध्ये समित्या गठीत करण्यात आल्या असल्याची माहिती भिडे गुरुजींनी दिली.