Thu, May 23, 2019 14:24
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › आठ दिवसांत नाशिकच्या प्रश्‍नांची तड!

आठ दिवसांत नाशिकच्या प्रश्‍नांची तड!

Published On: Jul 15 2018 1:29AM | Last Updated: Jul 14 2018 11:36PMनाशिक : प्रतिनिधी

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांनी विविध प्रश्‍नांची सरबत्ती करत प्रशासनाविषयी अत्यंत नाराजी व्यक्‍त केली. यावर निधी दिला नाही आणि कामे झाली नाही तर पुढल्या वेळी उमेदवारीसाठी कोणी तिकीट घेईल का असा नम्र प्रश्‍न आयुक्‍तांना उपस्थित करत असे काही करू नका, असे सांगितले. दरम्यान, शहरातील करवाढ, मालमत्ता व गाळे भाडेकरार, नगरसेवकांचे महासभेतील अधिकार आणि विकासकामे या सर्व प्रश्‍नांची तड येत्या आठवड्यात लावू, असे आश्‍वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे. यामुळे दत्तक शहराचे पालक काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे. 

अनेक दिवसांपासून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात धुसफुस आहे. परंतु, कोणी उघड उघड बोलत नव्हते. बोलून प्रशासनाला अंगावर घेणार कोण या भीतिपोटी प्रत्येकजण तोंडाला कुलूप लावून कसाबसा कारभार हाकत होते. यामुळे आपल्याला वाली पक्षश्रेष्ठीच म्हणून प्रत्येकजण मुख्यमंत्री आणि पालकमंत्री कधी वेळ देतात याकडे टक लावून होते. अखेर पालकमंत्र्यांचे पाय नाशिकला लागले आणि त्यांनी शहराच्या विविध प्रश्‍नांची कैफियत आपल्या शिलेदारांकडून ऐकून घेतली. परंतु, हे सर्व करत असताना आपल्यासमोरच अधिकारी नगरसेवक व पदाधिकार्‍यांना धोबीपछाड देत आहेत.

हे पाहूनही शांत बसण्याची किमया पालकमंत्र्यांनी साधल्याने त्याविषयी नगरसेवकांनीच आश्‍चर्य व्यक्‍त केले. पदाधिकार्‍यांकडून करवाढ, बंद अंगणवाड्या, महासभेचे अधिकार डावलले जात असल्याच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर पालकमंत्र्यांनी सहा-सात दिवसांत निर्णय घेऊ असे सांगत संतप्‍त नगरसेवकांना थोडासा का होईना शांत करण्याचा प्रयत्न केला. यामुळे इतके महिने प्रतीक्षा केली अजून आठ दिवस सहन करायला काय हरकत आहे असाच चेहरा करत पदाधिकारी आणि नगरसेवक विश्रामगृहातून बाहेर पडले. 

नगरसेवकांचा मान-सन्मान सांभाळला जाईल

नगरसेवकांना प्रभागातील कामे करावी लागतात. त्यासाठी निधी आवश्यक आहे. यामुळे विकासकामे करण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या जातील. तसेच नगरसेवकांना मान- सन्मान दिला पाहिजे. त्याबाबत आपणही आग्रही असून, तसे प्रशासनाला सांगितले जाईल. नागरिकांनी निवडून दिले आहे यामुळे त्यांची कामे करण्याचा अधिकार नगरसेवकांना असून, त्यांचे अधिकार अबाधित राहिले जातील याबाबतही काळजी घेतली जाईल, असेही महाजन यांनी सांगितले.