Wed, May 22, 2019 06:18होमपेज › Nashik › जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये अवघा ३५ टक्के पाणीसाठा

जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये अवघा ३५ टक्के पाणीसाठा

Published On: Apr 14 2018 1:41AM | Last Updated: Apr 13 2018 11:24PMनाशिक : प्रतिनिधी

रणरणत्या उन्हाने तापलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख 24 धरणांमध्ये आजमितीस 35 टक्के, तर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणासह समूहात प्रत्येकी 48 टक्के साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील एकूणच उपलब्ध जलसाठा बघता तो जून अखेरपर्यंत पुरणार असल्याने नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी तीन टक्के जलसाठा अधिक आहे. 

यंदा एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्याचा पारा चाळिशी पार पोहोचला होता. सद्यस्थितीत पारा 38 अंशांवर स्थिरावला आहे. या वाढत्या उन्हाने जिल्हावासीय घामाघूम झाले आहेत. ग्रामीण भागात काही तालुक्यांमध्ये टंचाईचे चटके बसायला सुरुवात झाली आहेे. अशा ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये पुरेसा साठा असल्याचे चित्र आहे. दरम्यान, चोवीस धरणांमध्ये 35 टक्के पाणी आहे. गतवर्षी याचकाळात हा साठा 20237 दलघफू म्हणजेच 30 टक्के इतका होता.

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात 2705 दलघफू पाणी आहे. समूहातील चार प्रकल्पांत 4957 दलघफू साठा आहे. त्यामुळे नाशिककरांची जून अखेरपर्यंतची पाण्याची समस्या सुटली आहे. जिल्ह्यातील दुसर्‍या महत्त्वाच्या दारणा समूहातील सात धरणांमध्ये आजमितीस 8 हजार 259 दलघफू एवढा साठा आहे. त्यातही एकट्या दारणात 4701 म्हणजेच 61 टक्के पाणी आहे. पालेखड समूहात 2516 दलघफू (30 टक्के) तर ओझरखेड समूहात 1093 दलघफू (34 टक्के) साठा आहे. गिरणा खोर्‍यातील सात धरणांमध्ये 6 हजार 900 तसेच चणकापूर धरणात 1203 दलघफू साठा आहे.

जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा यंदा तीन टक्के साठा अधिक आहे. यंदाच्या हंगामात धरणांमधून प्रमुख आवर्तने सोडण्यात आली आहे. आता मे महिन्याच्या मध्यात काही तालुक्यांसाठी प्रमुख धरणांमधून दोन ते तीन आवर्तने द्यावी लागणार आहे. त्यामुळे आजमितीस उपलब्ध पाण्याचा विचार केल्यास प्रमुख धरणांमधील पाणी हे जून अखेरपर्यंत पुरेल, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यावरील यंदाचे पाणीकपातीचे संकट तूर्तास तरी दूर सरले आहे.