Fri, Jul 19, 2019 22:48होमपेज › Nashik › म्हणे, गंगापूर 101 टक्के! 

म्हणे, गंगापूर 101 टक्के! 

Published On: Sep 04 2018 1:18AM | Last Updated: Sep 04 2018 1:18AMनाशिक : प्रतिनिधी

जिल्हा प्रशासनाने सोमवारी (दि. 3) दिलेल्या जिल्ह्यातील धरणसाठ्याच्या आकडेवारीत गंगापूर धरणात चक्क 101 टक्के पाणीसाठा दाखविला आहे. नियमानुसार धरणात क्षमतेपेक्षा अधिक पाणीसाठा करता येत नाही. त्यामुळे धरणातील हा अतिरिक्त साठा कोेठून आला हा संशोधनाचा विषय असला तरी यानिमित्ताने प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

जिल्हा प्रशासनाने सोमवारी 24 प्रमुख प्रकल्पांची आकडेवारी प्रसिद्ध केली. यामध्ये नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणाची मूळ क्षमता 7200 दशलक्ष घनफूट असून, गाळाचे प्रमाण पाहता ही क्षमता 5 हजार 630 दलघफू समजली जाते. सध्या या धरणात चक्क 5 हजार 686 दलघफू (101 टक्के) साठा दाखविण्यात आला आहे. वास्तविक जिल्हा प्रशासन हे पाटबंधारे विभागाकडून दररोज धरणांची आकडेवारी घेत असते. परंतु, प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार धरणात क्षमेतपेक्षा वाढीव 56 दलघफू पाणी धरणात दिसत आहे. त्यामुळे या आकडेवारीवरून नवीन वादंग उभे ठाकले आहेत.

मुळात पाटबंधारे विभागाच्या नियमानुसार धरणात 85 ते 95 टक्के पाणीसाठा करता येता. 2008 साली जिल्ह्यात सतत 10 दिवस पाऊस सुरू होता. गंगापूर धरणातही मोठ्या प्रमाणात त्यावेळी आवक सुरू होती. दरम्यान, तत्कालीन परिस्थितीत धरणाचा साठा 96 टक्क्यांवर पोहोचल्यावर धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आला. परिणामी गोदेला महापूर आल्याने अर्धेअधिक शहरात पुराचे पाणी शिरले होेते. 2016 मध्येही ऑगस्टच्या 2 तारखेला गोदेला महापूर आला. त्यावेळी शहरात

पाणी घुसून कोट्यवधींचे नुकसान झाले होते. महापुराचा हा पूर्वानुभव लक्षात घेता पाटबंधारे विभागाने धरणांचा साठा व विसर्गावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान, आत्ता प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीत गंगापूरसमोर तब्बल 101  टक्के साठा दर्शविण्यात आला आहे. हा मुद्राराक्षसाचा विनोद आहे की सरकारी अनास्था याची चर्चा सुरू आहे.