Tue, Jul 23, 2019 10:29होमपेज › Nashik › क्षमता बघूनच बँक कर्ज मिळेल

क्षमता बघूनच बँक कर्ज मिळेल

Published On: Apr 18 2018 12:52AM | Last Updated: Apr 18 2018 12:52AM नाशिक : प्रतिनिधी

तुमच्यातील क्षमता, इतिहास आणि कर्ज प्रकरणावेळी तुम्ही तारण म्हणून काय ठेवता, या सर्व गोष्टी तपासून तुम्हाला बँक कर्ज देईल. महामंडळ केवळ तुमच्या कर्जाचा परतावा करेल. त्यामुळे हप्ते वेळेत भरा, असे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या प्रकल्प संचालिका सुचिता भिकाणे यांंनी केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये मंगळवारी (दि.17) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बँकेत कर्जासाठी गेल्यावर प्रशासन मदत करत नाही. प्रस्तावाची फाइल सादर करून घेतल्यावर महिनोमहिने चकरा मारायला लावतात. कर्ज प्रकरणासाठी एकाच वेळी कोणती कागदपत्रे लागणार याची माहिती योग्यरीत्या दिली जात नाही, अशा अनेक तक्रारी लाभार्थ्यांनी केल्या. दरम्यान, नव्याने प्रकरण दाखल केल्यावर ते किती दिवसांत निकाली काढले जाईल, असा प्रश्‍नदेखील यावेळी काही लाभार्थ्यांनी उपस्थित केला. मात्र, या सर्व बाबींवर बँकेच्या अधिकार्‍यांना कोणत्याही प्रकारची समर्पक उत्तरे देता आली. अधिकार्‍यांच्या या भूमिकेवर लाभार्थ्यांनी रोष व्यक्त केला.

सरकारने महामंडळासाठी 400 कोटींची तरतूद केली आहे. महामंडळ प्रशासनाला लाभार्थ्यांबाबतचे कोणत्याही प्रकारचे उद्दिष्ट देण्यात आलेले नाही. त्यामुळे जिल्हास्तरावरील महामंडळाच्या कार्यालयांना कोणतेही उद्दिष्ट देणार नसल्याचे भकाणे यांनी स्पष्ट केले. उद्योग सुरू करायचा असल्यास त्याबाबत सविस्तर अहवाल तयार करून तो बँकेकडे घेऊन जा. बँकेला तुम्ही कोणता व्यवसाय करणार आहेत, हे पटवून द्या, असेही सांगण्यास भिकाणे विसरल्या नाहीत. दरम्यान, एखाद्या बँकेने कर्ज देण्यास अनुत्सकता दाखविल्यास दुसर्‍या बँकेत प्रस्ताव सादर करा, असेही भिकाणे यांनी सांगितले. त्यावर अधिकारीच असा अजब सल्ला देत असल्याबद्दल लाभार्थ्यांनी संताप व्यक्त करत, सभागृहातून काढता पाय घेणे पसंत केले. यावेळी महामंडळाच्या टास्क फोर्सचे प्रतिनिधी किरण पटवर्धन, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे संचालक संपत चाटे यांच्यासह जिल्हा लीड बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

Tags : Nashik, Ability, get, bank, loan, can, seen