Wed, Jul 17, 2019 18:29होमपेज › Nashik › शिवीगाळ प्रकरणामुळे दुपारनंतर मोहीम स्थगित

शिवीगाळ प्रकरणामुळे दुपारनंतर मोहीम स्थगित

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मालेगाव : प्रतिनिधी

भायगावमधील आजोंद्याबाबा मंदिर निष्कासित करण्याची कार्यवाही सुरू असताना एका मद्यपीने महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना शिविगाळ करत अर्वाच्च शब्दात उद्धार केला. त्या धट्टींगणावर कारवाईची सूचना प्रशासन आयुक्तांनी केली. परंतू, वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी प्रथम एफआयआर द्या, मग कारवाई केली जाईल, अशी अजब भूमिका घेतल्याने संतप्त मनपा पथकाने दुपारनंतरची कारवाई स्थगित केली. त्यामुळे मोसमपुलवरील कारवाईला महापालिकेचे पथक फिरकले नाही. 

मंदिर निष्कासित करण्याच्या कार्यवाहीच्या प्रारंभीपासूनच महापालिका व पोलिस विभागात मतभेद दिसून आले. शनिवारी आजोंद्याबाबा मंदिरवरील कार्यवाहीप्रसंगी बंदोबस्त पुरेसा असला तरी अधिकारी त्यापासून अंतर राखूनच राहिले. महापालिकेच्या अधिकार्‍यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यात काहींकडून अडथळे येत राहिले. त्याकडे दुर्लक्ष करत अधिकार्‍यांनी कार्यवाही पूर्णत्वास नेली. त्याचा गैरअर्थ काढत एका मद्यपीने वरिष्ठ अधिकार्‍यांना शिविगाळ केली. संबंधितावर कारवाई करण्याची विनंती प्रशासन उपायुक्त डॉ. प्रदीप पाठारे यांनी पोलिस अधीक्षक अजित हगवणे यांच्याकडे केली गेली. परंतू, पहिले एफआयआर द्या मग कारवाई करू, असे सुनावले. घटनास्थळापासून वडनेर खाकुर्डी पोलिस ठाणे 15 किलोमीटर अंतरावर असल्याने प्रथम संबंधितावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, सायंकाळपर्यंत रितसर तक्रार दाखल केली जाऊ शकते, अशी अपेक्षा मनपा अधिकार्‍यांनी व्यक्त केली. या चर्चेचा अंदाज घेत शिविगाळ करणारा पसार झाला. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसमक्ष जबाबदार अधिकार्‍यांना शिविगाळ होते, तरी पोलिस कारवाई होत नसेल, तर  शनि मंदिराजवळ तीव्र विरोध झाल्यास पथकाला पोलिस संरक्षण देतील का, असा प्रश्‍न निर्माण करण्यात आला. त्यामुळे डॉ. पाठारे यांनी पुढील मोहीम स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

पोलीस आणि महापालिका प्रशासनातील अंतर्गत विसंवादाची कुणालाच कुणकुण नसल्याने शनि मंदिर व हनुमान मंदिराच्या व्यवस्थापकांनी स्वयंस्फूर्तीने मूर्ती हलविण्याची कार्यवाही केली होती. मनपाच्या जेसीबीने शिळेभोवतीचे बांधकाम तोडून मूर्ती काढण्याचा मार्ग मोकळा केला. त्यानंतर जेसीबी पथक प्रभाग एककडे रवाना झाले ते नंतर रात्री साडेसात वाजेपर्यंत फिरकलेच नाही. त्यामुळे ‘छावणी’चे पोलिस निरीक्षक इंद्रजित विश्‍वकर्मा यांनी डॉ. पाठारे, उपायुक्त अंबादास गर्कळ, सहाय्यक आयुक्त राजू खैरनार यांची भेट घेत कार्यवाही पूर्णत्वास नेण्याची शिष्टाई केली. परंतू, भायगावमधील प्रकारामुळे अधिकार्‍यांमध्ये असुरक्षिततेची भावना असल्याने कारवाई स्थगितच राहिल. झाल्याप्रकाराचा अहवाल शासनाला सादर केला जाईल, असे उपायुक्तांनी स्पष्ट सांगिलते. विश्‍वकर्मा यांनी भायगावसारखी मोसम पूलजवळ परिस्थिती नाही. आम्ही सुरक्षा देण्यास समर्थ असल्याने राहिलेले महादेव मंदिर निष्कासित करावे, अशी सूचना केली. अधिकार्‍यांनी कटू अनुभवाचे दाखले देत पुन्हा कारवाई सुरू करण्यास नकार दिल्याने विश्‍वकर्मा यांनी ‘ठिक आहे तर बंदोबस्त संपला अशी स्टेशन डायरीला नोंद करतो’ म्हणत माघारी फिरले.