होमपेज › Nashik › सनातनचा साधक जळगावमधून ताब्यात

सनातनचा साधक जळगावमधून ताब्यात

Published On: Sep 06 2018 9:48PM | Last Updated: Sep 06 2018 10:46PMजळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यातील साकळी (ता. यावल) येथे एटीएस पथकाने गुरुवारी छापा टाकून 28 वर्षीय तरुणास ताब्यात घेतले. वासुदेव सूर्यवंशी असे या तरुणाचे नाव असून त्याच्या घराच्या झडतीत सनातनचे साहित्य, पुस्तके, व्हिडिओ सीडी व काही कागदपत्रे आढळून आली आहेत. याबाबत एटीएसने काहीही माहिती देण्यास नकार दिला आहे. मात्र, तरुणाला दाभोलकर हत्येप्रकरणी ताब्यात घेतल्याची चर्चा आहे.

गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास साकळी गावात दोन वाहनांद्वारे दाखल झालेल्या एटीएसच्या पथकाने वासुदेवला ताब्यात घेतले. यानंतर एका वाहनात वासुदेवला बसवून पथक नाशिककडे रवाना झाले. तर दुसर्‍या वाहनातील पाच अधिकार्‍यांच्या पथकाने सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत घराची झडती घेतली. सूर्यवंशी हा मूळचा कर्की (ता.मुक्ताईनगर) रहिवासी असून, वडिलांच्या निधनानंतर तो मामाच्या गावी साकळी येथेे गॅरेज व्यवसाय करतो.

साहित्य, सीडी आढळली

वासुदेव सूर्यवंशी याच्या घरातून झडतीदरम्यान सनातनचे साहित्य, पुस्तके, व्हिडिओ सीडी व काही कागदपत्रे आढळली. हे साहित्य पथकाने ताब्यात घेतले. दरम्यान, सूर्यवंशीला नाशिक येथे हलवणाऱ्या पथकाकडून त्यास चौकशीसाठी मुंबई येथे देखील नेण्याची शक्यता आहे.