Sun, Jul 12, 2020 21:02होमपेज › Nashik › दहावी-बारावी फेरपरीक्षा भरारी पथकांची नजर : खेडकर

दहावी-बारावी फेरपरीक्षा भरारी पथकांची नजर : खेडकर

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 13 2018 10:49PMनाशिक : प्रतिनिधी

फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एक संधी म्हणून येत्या मंगळवारपासून (दि.17) त्यांची फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेवर भरारी पथकांची नजर असणार असून, अनुचित प्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाने सर्वतोपरी खबरदारी घ्यावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिले आहेत. 

येत्या मंगळवारपासून जिल्ह्यात दहावी-बारावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होत आहे. दहावीचे 17 जुलै ते 2 ऑगस्ट तर बारावीचे 17 जुलै ते 4 ऑगस्ट या काळात पेपर होणार आहे. या परीक्षांच्या तयारीबाबतचा आढावा खेडकर यांनी शुक्रवारी (दि.13) घेतला. जिल्ह्यात पाच हजार 847 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार असून, त्यासाठी 16 केंद्रे निश्‍चित करण्यात आली आहे. तर बारावीसाठी केंद्रांची संख्या 13 इतकी असून,  सहा हजार 308 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. परीक्षा काळात कॉपी व इतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर 144 कलम लागू करण्यात आले आहे.

माध्यमिक शिक्षण अधिकारी व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला जिल्हास्तरावर पथके तैनात करण्याच्या सूचना खेडकर यांनी बैठकीत दिल्या. तसेच तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या नेतृत्वात गटशिक्षण व गटविकास अधिकार्‍यांची पथके तयार केली जाणार आहेत. ही पथके तालुक्यातील सर्व केंद्रांना भेटी देतील, असेही खेडकर यांनी स्पष्ट केले आहे. बैठकीला माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागासह, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग तसेच पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.