होमपेज › Nashik › दसाणा येथील आग विझविण्यात यश

दसाणा येथील आग विझविण्यात यश

Published On: Feb 25 2018 1:14AM | Last Updated: Feb 24 2018 11:53PMविरगाव : वार्ताहर

चार दिवसांपासून दसाणा (ता. बागलाण) परिसरातील सामाजिक वनीकरण क्षेत्रास लागलेली आग विझविण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे. या आगीचा फटका जंगली प्राण्यांबरोबरच दसाणा, केळझर व डांगसौंदाणे या संपूर्ण परिक्षेत्रास बसला असून, शेकडो हेक्टर क्षेत्र या आगीमुळे जळून खाक झाले आहे. वारंवार घडणार्‍या या आगीच्या घटनांना वनविभागाचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

बागलाणच्या पश्‍चिमेला असलेल्या दसाणा, केळझर व डांगसौंदाणे परिक्षेत्रातील डोंगररांगांवर सामाजिक वनीकरण विभागामार्फत शेकडो हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवड करण्यात आली आहे. या विभागाकडून वृक्ष संगोपनाची जबाबदारीही उत्तमरीत्या पार पाडली जात असल्याने या डोंगररांगा हिरव्यागार वृक्षसंपदेने नटून जंगली प्राण्यांचे वास्तव्यही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. मात्र, दरवर्षी या राखीव वनक्षेत्रास आग लागण्याचे प्रकार घडत असून, यास वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारीवर्गाचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे.

चार दिवसांपूर्वी केळझर भागाकडून या राखीव क्षेत्रास आग लागल्यानंतर आगीने रौद्ररूप धारण करीत डांगसौंदाणे व दसाणा भागातील  मोंढ्या डोंगरावरील राखीव वनक्षेत्रही यात जळून खाक झाले आहे. या आगीत दसाणा गावक्षेत्रातील सुमारे 15 हेक्टरहून अधिक क्षेत्र यात बाधित झाले आहे. याचा फटका या भागात आढळणार्‍या मोर, तरस व बिबट्या या जंगली प्राण्यांना बसला असून, या वणव्यामुळे या प्राण्यांनी आपली धाव आता मानवी वस्तीकडे घेतल्याचे दिसून येत आहे. राखीव वनक्षेत्रास लागलेली आग विझविण्यास शुक्रवारी वनविभागाला यश आले असून, नेहमीच लागणार्‍या या आगीच्या मुळाशी जाऊन कारणांचा शोध घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.