होमपेज › Nashik › एका लग्नाची गोष्ट: ...आणि वऱ्हाडी नवरीला रेल्वेत विसरले

एका लग्नाची गोष्ट: ...आणि वऱ्हाडी नवरीला रेल्वेत विसरले

Published On: Mar 25 2018 3:40PM | Last Updated: Mar 25 2018 3:43PMइगतपुरी : वार्ताहर  

नागपुरहून इगतपुरीला रेल्वेने लग्नासाठी येत असताना नाशिकरोड स्थानकावर नवरी मुलगीच गाडीत राहिली. नवरी गाडीतच राहिल्याने सर्वच नातेवाईकांची धांदल उडाली. नवरीचा इगतपुरीच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी शोध घेतला. काही तासातच नवरी मुलीला तिच्या मामाच्या स्वाधीन करण्यात आले. त्यामुळे आज या नवरीचे लग्न संपन्न झाले. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांच्या या कामगिरीमुळे रेशमगाठी वेळेवर जुळल्या त्यामुळे सर्व नातेवाईकांनी जवानांचे आभार मानले आहे.

आज दि.२५ मार्च रोजी नागपुरहून नागपुर मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस रेल्वेने प्रवास करत सुरेशराम विष्णु मिरेगे, नरेश रामचंद्र तवले, नवीन नवरी रजनी व त्यांचे सर्व नातेवाईक हे सकाळी ८.४५ वाजता नाशिकरोड रेल्वे स्टेशनला उतरले. सर्वजण सामान उतरविण्याच्या नादात असताना नवरी मुलगी रजनी हि फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेली होती. हे कोणाच्याच लक्षात आले नाही. गाडी स्टेशन सोडून मुंबईच्या दिशेने रवाना झाली. नवरी मुलगी गाडीतच राहील्याची बाब नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांची धांदल उडाली. याची बातमी रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांना दिली. नाशिकरोडच्या सुरक्षा बलाने या घटनेची दखल घेत त्वरीत इगतपुरी रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस निरीक्षक सतिष विधाते यांना कळविली. विधाते यांनी रेल्वे स्थानकावर जाऊन नागपुर एक्सप्रेस गाडीची तपासणी केली असता त्यांना रजनी सापडली. त्यांनी त्वरित नाशिकरोडला कळविले.

 ही खबर मिळताच मुलीच्या मामांनी इगतपुरीला धाव घेऊन रेल्वे सुरक्षा बल कार्यालय गाठले. मुलगी आपलीच भाची आहे अशी ओळख पटवल्यानंतर एएसआय बलवंत सिंह यांनी आज सकाळी ९.४५ वाजता त्या नवरी मुलीला मामाच्या स्वाधीने सुखरुप हवाली केली. आज दुपारी या मुलीचे नाशिक शहरात लग्न झाले आहे. या तपासकामी गजानन जाधव, महिला कॉस्टेबंल अनिता गवई, विकास सांळुके, इगतपुरी स्टेशन मास्टर यांचे सहकार्य लाभल्याने नवरी मुलगी रजनी हीचे लग्न वेळेवर संपन्न झाल्याने नातेवाईकांनी रेल्वे सरक्षा बलाचे आभार मानले.
 

Tags : Bride, Groom, Marrige, Nashik, Relway, Station, Police