Thu, May 23, 2019 21:10
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › मनपा सीबीएसई शाळा उघडणार

मनपा सीबीएसई शाळा उघडणार

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 26 2018 11:51PMनाशिक : प्रतिनिधी

बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर शहरात विविध ठिकाणी ई-टॉयलेट उभारण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके यांनी दिली असून, यासंदर्भात त्यांनी नगरसेवकांकडून जागेसाठी प्रस्ताव मागितले आहेत. त्याचबरोबर गोरगरीब व सामान्य कुटुंबातील हुशार मुलांसाठी प्रायोगिक तत्त्वावर मनपाच्या माध्यमातून एक सीबीएसई पॅटर्नची शाळा सुरू करण्याचा मानसही त्यांनी व्यक्‍त केला आहे. 

महापालिका शिक्षण मंडळामार्फत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्यानुसार मनपाच्या 90 शाळांपैकी बहुतांश सर्वच शाळांमध्ये डिजिटल क्‍लासरूम आहेत. मनपाच्या शैक्षणिक धोरणात अनेक आमूलाग्र बदल होत असल्याने यंदाच्या वर्षी तर इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील जवळपास 173 मुलांनी मनपाच्या शाळांमध्ये प्रवेश घेतल्याची एक सुखद वार्ता समोर आली आहे. यामुळे याच अनुषंगाने विचार करता मनपा शाळांमधील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी मनपामार्फत सीबीएसई पॅटर्नची एखादी शाळा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याचे स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके आहेर यांनी सांगितले. त्यासाठी संपूर्ण पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याच्या द‍ृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर महिलांसाठी शहरात विविध ठिकाणी बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर ई-टॉयलेट उभारले जाणार आहेत. प्रत्येक विभागात 10 याप्रमाणे 60 टॉयलेट उभारण्याचे प्रस्तावित असून, त्यासाठी त्यांनी महिला नगरसेविकांकडून त्या-त्या प्रभागात नेमके कुठे टॉयलेटची आवश्यकता आहे याबाबतची माहिती मागविली आहे. यासंदर्भात त्यांनी स्थायी समितीकडे अंदाजपत्रक आल्यानंतर या उपक्रमाचा समावेश केला आहे. परंतु, प्रशासनाच्या अंदाजपत्रकात त्याचा समावेश नसल्याने पीपीपी तत्त्वावर ई-टॉयलेट उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. एका ई-टॉयलेटसाठी चार ते पाच लाख इतका खर्च अपेक्षित आहे. असा खर्च करून टॉयलेट उपलब्ध करून देणार्‍या संस्थांना मनपामार्फत आवाहन केले जाणार आहे. तसेच शहरातील बडे उद्योजक आणि कंपन्यांनादेखील स्थायी समितीमार्फत पत्रव्यवहार केला जाणार असल्याचे सभापती आडके यांनी सांगितले.