Sat, Feb 23, 2019 06:04होमपेज › Nashik › नाशिक, औरंगाबादमधील म्हाडाची ९२१ घरे विक्रीविना पडून

नाशिक, औरंगाबादमधील म्हाडाची ९२१ घरे विक्रीविना पडून

Published On: Feb 04 2018 1:55AM | Last Updated: Feb 04 2018 1:47AM मुंबई : प्रतिनिधी

म्हाडाने नाशिक आणि औरंगाबादमध्ये बांधलेली तब्बल 921 घरे विक्रीविना पडून आहेत.  खासगी विकासकांच्या तुलनेत म्हाडाच्या या घरांचे दर जास्त असल्याने या दोन्ही शहरांतील घरांकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही प्रकल्पांमध्ये म्हाडाची सुमारे 263 कोटी रुपयांची गुंतवणूक अडकून राहिली आहे. आता या घरांच्या किमती कमी करून पुन्हा त्यांची विक्री करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

म्हाडाच्या नाशिक मंडळाने दोन ते तीन वर्षांपूर्वी नाशिकमध्ये 901 बांधली तारा औरंगाबाद मंडळाने औरंगाबादमध्ये 20 घरे बांधली. त्यामध्ये म्हाडाने 263 कोटी 84 लाख रुपये गुंतवले. मात्र नाशिक आणि औरंगाबादमधील खासगी विकासकांच्या तुलनेत म्हाडाच्या घरांचे दर जास्त आहेत. यामुळे या घरांकडे ग्राहक आलेच नाहीत. या घरांच्या बांधकामाचा दर मुंबईतील बांधकामाच्या दरावर आधारित होता. 

मुंबईतील बांधकामाच्या दरांपेक्षा नाशिक व औरंगाबादमधील बांधकामाचे दर कमी आहेत. मात्र म्हाडा प्रशासनाने मुंबईतील दरानेच नाशिक व औरंगाबादमधील घरे बांधण्याचे कंत्राट देण्यात आले. या दरांना म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देणे आवश्यक होते. पण बैठकीत या दरांविषयी मान्यता घेण्यात आली नाही. घाईघाईने सर्क्युलर पद्धतीने या दरांना मान्यता देण्यात आली. दरांच्या फाइलवर संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांची मंजुरी घेऊन दर निश्‍चित करण्यात आले. बांधकामांचा दर जास्त असल्याने घरांच्या किमतीही वाढल्या. परिणामी घरे विक्रीविना पडून राहिली. 

ही घरे बांधणार्‍या कंत्राटदाराचे 263 कोटी 84 लाख रुपये म्हाडाने अदा केले. पण घरांची विक्री न झाल्याने म्हाडाच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक बोजा पडला आहे. आता या घरांच्या किमती वीस टक्क्यांनी कमी करून त्याची विक्री करण्याच्या हालचाली सुरू आहेत.