Wed, Mar 20, 2019 08:31होमपेज › Nashik › सप्‍तशृंगगड 80 टक्के प्लास्टिकमुक्‍त!

सप्‍तशृंगगड 80 टक्के प्लास्टिकमुक्‍त!

Published On: Jul 19 2018 1:38AM | Last Updated: Jul 19 2018 12:25AMनाशिक : प्रतिनिधी

सप्‍तशृंगगडावर 80 टक्के प्लास्टिकबंदी यशस्वी झाली असल्याचा दावा जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आला असून, त्यावर पर्यावरणमंत्र्यांनी प्रशासनाची पाठ थोपटली आहे. एवढेच नव्हे, तर आपण सप्‍तशृंगीदेवीच्या दर्शनाला येऊन या कामासाठी जिल्हा परिषदेला पुरस्कार देऊ, अशी ग्वाहीही दिली आहे. दुसरीकडे सप्‍तशृंगगड ग्रामपंचायतीने मात्र जिल्हा परिषदेचा हा दावा खोडून काढला असून, हे एकट्या जिल्हा परिषदेचे श्रेय नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या दाव्यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. 

राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी बुधवारी (दि. 18) जिल्ह्याच्या प्लास्टिकमुक्‍तीचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. त्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी सप्‍तशृंगगडावर 80 टक्के प्लास्टिकबंदी यशस्वी झाल्याचा दावा केला. या यशाबद्दल कदम यांनी प्रशासनाच्या कारभाराचे कौतुक केले. त्यावर गिते यांनी कदम यांच्याकडे ‘आता आम्हाला पुरस्कार हवा’ अशी गळ घातली. कदम यांनी त्यांना होकार देत ‘मी सप्‍तशृंगी देवीच्या दर्शनाला येतो, येताना पुरस्कारही घेऊन येतो’, अशी ग्वाही दिली. याशिवाय कंपन्यांकडून सामाजिक दायित्व निधी मिळवून प्लास्टिकबंदीविषयी प्रबोधन करावे, कापडी पिशव्यांचे वाटप करावे, अशा सूचनाही कदम यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासह नगरपालिकांचे मुख्याधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित होते. 

दरम्यान, सप्तशृंगगड 80 टक्के प्लास्टिकमुक्‍त झाल्याचा जिल्हा परिषदेने केलेला दावा मात्र वादात सापडला आहे. सप्‍तशृंगगड ग्रामपंचायतीने हा निव्वळ श्रेय लाटण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. प्लास्टिकबंदीसाठी दीड वर्षापासून सतत प्रयत्न सुरू होते. जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायतीसह सर्वांच्या योगदानातून गडावर प्लास्टिकबंदी यशस्वी झाली असून, त्याचे श्रेय जिल्हा परिषद एकटी कशी लाटू शकते, यासंदर्भात आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात आले आहे.