Sun, Mar 24, 2019 22:58
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › दुधाचे ७१ टँकर बंदोबस्तात रवाना

दुधाचे ७१ टँकर बंदोबस्तात रवाना

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 19 2018 10:25PMनाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यातून दुधाचे 71 टँकर गुरुवारी (दि. 19) मुंबई आणि सुरतकडे बंदोबस्तात रवाना करण्यात आले. यामध्ये नाशिकसह शेजारील नगर, धुळे व जळगावमधून दूधपुरवठा करणार्‍या टँकरचा समावेश आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला पाच रुपये वाढीव भाव मिळावा. यासाठी राज्यभरात सोमवारपासून (दि. 16) आंदोलन पुकारले आहे. आंदोलनादरम्यान, गुरुवारी दुधाचे 71 टँकर रवाना झाले. यातील 44 टँकर मुंबईकडे तर 27 टँकर सूरतला बंदोबस्तात पाठविण्यात आले. दरम्यान, यावेळी धुळे, चाळीसगाव व जळगावमधून मुंबईला दूध घेऊन जाणारे टँकर दुपारच्या सुमारास ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्याच्या वेशीपर्यंत म्हणजेच कसारा घाटापर्यंत बंदोबस्तात रवाना केले.

आंदोलनकर्त्यांनी मुंबईला दुधाचे पुरवठा करणारे टँकर फोडण्यापासून ते प्लास्टिकबंद दूध रस्त्यावर फेकत निषेध नोंदविला. मात्र, नाशिक जिल्ह्यात या आंदोलनाला म्हणावा तसा प्रतिसाद लाभला नाही. जिल्ह्यातील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना कसारा पोलिसांनी आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी कसारा घाटात ताब्यात घेतले. परिणामी, जिल्ह्यातील आंदोलनाची धग कमी झाली आहे. दरम्यान, पहिल्या दिवशी 41 तर दुसर्‍या दिवशी 88 टँकर मुंबईसह सुरत व इतर ठिकाणी पोलीस बंदोबस्तात रवाना झाले. 

स्वाभिमानी, मनसेचे पदाधिकारी ताब्यात

गुरुवारी (दि.19) दुपारी चांदवड- मनमाड राज्य महामार्गावर आंदोलनासाठी उतरलेल्या स्वाभिमानी संघटनेचे चांदवड तालुकाध्यक्ष गोपीनाथ झाल्टे, संपर्कप्रमुख रवींद्र झाल्टे, संतोष गुंजाळ, दगू  झाल्टे, मनसेचे तळेगावरोही गटप्रमुख संजय गुंजाळ, तालुका सरचिटणीस भागवत झाल्टे, अनिल गुंजाळ आदींना पोलीस निरीक्षक अंनत मोहिते यांनी ताब्यात घेतले.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

मालेगावचे पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे, चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी, रामकृष्ण जगताप, मालेगावचे पोलीस उपनिरीक्षक विलास चवळी आदी पोलीस कर्मचार्‍यांच्या कडक बंदोबस्तात दुधाचे टँकर मालेगाव, चांदवड, पिंपळगाव बसवंत मार्गे मुंबईला रवाना करण्यात आले.