Wed, Feb 26, 2020 09:22होमपेज › Nashik › नाशिक पोलिसांकडे ७० ऑनलाइन तक्रारी 

नाशिक पोलिसांकडे ७० ऑनलाइन तक्रारी 

Published On: Dec 23 2017 2:10AM | Last Updated: Dec 22 2017 11:15PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

पोलीस यंत्रणेचा कारभार पारदर्शक व्हावा आणि तक्रारींचा त्वरित निपटारा व्हावा. यासाठी पोलीस दलाचे ‘सिटीजन पोर्टल’ तयार करण्यात आले आहे. 26 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या यंत्रणेमार्फत शहरातून 70 ऑनलाइन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार या तक्रारींवर अंमलबजावणी करण्यात येत आहे. 

अनेकदा पोलिसांकडे जाऊन तक्रार करण्यास सामान्य नागरिक हिंमत करत नाही किंवा त्यांनी केलेल्या तक्रारींची दखल पोलिसांकडून घेतली जात नसल्याचा आरोप होत असतो. त्यामुळे अनेकदा वादविवाद होतात. तसेच, सर्वसामान्यांना न्याय मिळण्यास अडचण होत असते. ही बाब ओळखून नागरिकांना ऑनलाइन तक्रारी करण्यासाठी सिटीजन पोर्टल तयार करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, नागरिकांनी येथे प्रत्यक्ष येऊन तक्रार केल्यासही त्याची नोंद केली जात आहे. त्यानुसार आतापर्यंत या ठिकाणी 70 नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यापैकी 13 तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून, उर्वरित तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात पाठवण्यात आल्या असून, त्यावरही अंमलबजावणी होत आहे. 

पोलीस ठाणे स्तरावर अनेकदा तक्रारी ऐकून न घेतल्यास किंवा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यास अनेक नागरिक थेट पोलीस आयुक्तालयात येऊन पोलीस आयुक्तांची भेट घेत असतात. मात्र, आता सिटीजन पोर्टलमुळे नागरिकांना ऑनलाइन तक्रारी केल्यानंतरही पोलीस आयुक्तांकडेही कैफियत मांडता येणे शक्य होत आहे. यामुळे तक्रारींची दखल वरिष्ठ पातळीवरून घेतली जात आहे. या तक्रारींचा निपटारा करणे संबंधित पोलीस ठाण्यांना करावाच लागत असल्याने नागरिकांचेही समाधान होत आहे.