Wed, Nov 21, 2018 21:56होमपेज › Nashik › वयाकडे दुर्लक्ष करा, रसरशीत जगा : जब्बार पटेल

वयाकडे दुर्लक्ष करा, रसरशीत जगा : जब्बार पटेल

Published On: Jul 10 2018 1:03AM | Last Updated: Jul 09 2018 11:01PMनाशिक : प्रतिनिधी

ज्येष्ठांवर स्वत:चीच नव्हे, तर त्यांच्या मुला-नातवंडांचीही जबाबदारी असून, त्यांच्याकडे सध्या दुर्मिळ झालेली मायेची ऊब असते. त्यांनी वयाकडे दुर्लक्ष करून रसरशीतपणे जगावे, असा सल्ला ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी दिला.

लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचाच्या सतराव्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख वक्‍ते म्हणून ते बोलत होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सोमवारी (दि. 9) हा कार्यक्रम झाला. विश्‍वास बँकेचे अध्यक्ष विश्‍वास ठाकूर, ‘पार्कसाइड’चे संचालक मर्झियान पटेल, वोक्हार्टचे अभिषेक शर्मा, ब्रिजमोहन चौधरी, ‘लोकज्योती’चे अध्यक्ष सुरेश विसपुते, उपाध्यक्ष भा. रा. सूर्यवंशी, कार्याध्यक्ष डी. एम. कुलकर्णी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी डॉ. पटेल म्हणाले, सध्या वयाच्या चाळिशीत ताणतणाव वाढत आहे. आई-वडिलांकडे मुलांसाठी वेळ नाही. त्यामुळे ज्येष्ठांवर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे.

त्यांनी आपले वय मनात न येऊ देता, संगीत, नाटके, खेळ, निसर्गात मन रमवावे. दर 6 महिन्यांनी रक्‍ततपासणी करून घ्यावी. धर्म-जात-पंथ बाजूला ठेवत माणूस म्हणून जगावे. विश्‍वास ठाकूर यांनी आई-वडील नसण्यासारखे जगात दुसरे दु:ख नसल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात नारायण भोकरे, हरिभाऊ मथुरे, बाळकृष्ण जोशी, कोंडाजी कदम, देवीदास बोरसे या वयाची नव्वदी पार करणार्‍या ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला. तर दैनिक ‘पुढारी’चे ज्ञानेश्‍वर वाघ यांच्यासह श्याम बागूल, शशिकांत सातपुते, सचिन जैन, अरुण मलाणी या पत्रकारांचाही सन्मान करण्यात आला. ‘लोकज्योती’चे सचिव रमेश डहाळे यांनी प्रास्ताविक केले. सीमा पेठकर यांनी सूत्रसंचालन केले. जितेंद्र येवले यांनी आभार मानले.

‘घाशीराम’ नव्याने करणार

‘घाशीराम कोतवाल’ हे एकेकाळी गाजलेले व वादग्रस्त ठरलेले नाटक अनेकांना पाहता आले नसल्याने ते आपण पुन्हा करणार असल्याचे व त्याचे पाच कॅमेर्‍यांद्वारे चित्रीकरण करणार असल्याचे यावेळी डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले. तसेच आपले वय 76 झाले असताना, आणखी एक नवे नाटकही करणार असल्याचे त्यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. 

‘एकनाथी भारुड’ कार्यक्रम रंगला

प्रसिद्ध कलावंत निरंजन भाकरे यांचा एकनाथी भारुडाचा कार्यक्रम रंगला. त्यात त्यांनी वासुदेव, पोतराज, नंदीबैलवाला या लोककलाप्रकारांना रंगमंचावर साकारले. ‘बुरगुंडा’ हे भारुड सादर करीत व्यसनमुक्‍ती, स्त्रीभ्रूणहत्या, ज्येष्ठांच्या समस्या यांविषयी प्रबोधन केले. चमूमध्ये चतुर्भुज राजपूत, शांताराम दुसाने, भगतसिंह राजपूत, शिवसिंह राजपूत, शेखर भाकरे, दिलीप गोडबोले, सागर सपकाळ या कलावंतांचा समावेश होता.