Mon, May 20, 2019 10:21होमपेज › Nashik › नाशिक जिल्ह्यातील ६५७ विहिरी असुरक्षित

नाशिक जिल्ह्यातील ६५७ विहिरी असुरक्षित

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 19 2018 10:22PMनाशिक : प्रतिनिधी

सुरगाणा तालुक्यातील राहुडे व कळवण तालुक्यातील वीरशेत या गावांमध्ये दूषित पाणी प्यायल्यामुळे उद्भवलेल्या गॅस्ट्रोच्या साथीनंतर जागे झालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने भरपावसाळ्यात जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठ्याचे स्रोत तपासण्याचे आदेश दिले होते. या तपासणीत 2,064 पैकी  657 विहिरींना कठडे व्यवस्थित बांधलेले नसल्याचे आढळून आले असून, हे कठडे शासन निकषाप्रमाणे बांधण्याचे आदेश  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहेत.

पावसाळ्यात दूषित पाण्याचा पुरवठा होऊन साथारोगाचा प्रादुर्भाव  होऊ नये म्हणून  सर्व गटविकास अधिकार्‍यांना सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे ग्रामपंचायत स्तरावर सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी तालुकास्तरावर प्रत्येक ग्रामपंचायतीमधील स्रोत तपासणीसाठी  पथक तयार करण्यात आले होते. सर्वेक्षणात आलेल्या आकडेवाडीनुसार विहिरीचे कठडे एक मीटरवरपर्यंत व्यवस्थित न बांधलेल्या 657 विहिरी आढळल्या.

विहिरीचे कठडे एक मीटर वरपर्यंत व्यवस्थित बांधण्याचे तसेच विहिरी भोवती सिमेंटचा ओटा तीन मीटर पेक्षा जास्त रुंदीचा करण्यासंदर्भात सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, सुरगाणा तालुक्यात गॅस्ट्रोची साथ उद्भवण्यास विहिरीत नाल्याचे पाणी मिसळण्याबरोबरच चिंध्याही कारणीभूत ठरल्या. ज्यावेळी साथ उद्भवली त्यानंतर प्रशासनाला जाग आली असून, स्रोतांची सुरक्षितता तपासली जात आहे. आता भरपावळ्यात ही तपासणी सुरू असून, कठडे वाढविण्याचे कामही याचवेळी सुरू राहणार आहे.