Sun, May 19, 2019 14:25
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › 600 किलो प्लास्टिक नाशिकमध्ये जप्‍त

600 किलो प्लास्टिक नाशिकमध्ये जप्‍त

Published On: Jun 24 2018 1:34AM | Last Updated: Jun 23 2018 11:45PMनाशिक : प्रतिनिधी

महापालिकेच्या आरोग्य विभागाने शनिवारी (दि.23) दिवसभर शहर परिसरात धडक मोहीम राबवत प्लास्टिकचा वापर आणि विक्री करणार्‍या 72 जणांवर दंडात्मक कारवाई करत 600 किलो प्लास्टिक जप्‍त केले. तसेच तीन लाख 60 हजार रुपयांचा दंड वसूल केला.

महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा (नियंत्रण) कायद्यानुसार नाशिक महापालिका कार्यक्षेत्रात 23 जूनपासून प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने विभागीय कार्यालय स्तरावर विभागीय अधिकार्‍यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती 8करुन त्यांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक विभागात एक अशी एकूण सहा पथके कार्यान्वित केली आहेत. या पथकांनी बाजारपेठा, व्यावसायिक संकुलांची पाहणी करत शनिवारी (दि.23) धडक मोहीम राबवून प्लास्टिकचा वापर व विक्री करणार्‍यांविरूध्द दंडात्मक कारवाई केली. नाशिक पूर्व विभागात 14 जणांविरूध्द कारवाई करत त्यांच्याकडून 70 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. पश्‍चिम विभागात 15 जणांकडून 75 हजार, नाशिकरोड विभागात 12 वापरकर्त्यांविरूध्द 60 हजार रुपये, पंचवटी विभागात 16 विक्रेते व व्यापार्‍यांकडून 80 हजार रुपये, सातपूर विभागात पाच जणांविरूध्द कारवाई करत 25 हजार रुपये तर सिडको विभागात 10 जणांविरूध्द कारवाई करून त्यांच्याकडून 50 हजार रुपये वसूल केले. एकूण 72 विक्रेते व व्यापार्‍यांविरूध्द कारवाई करून तीन लाख 60 हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. या सहा पथकांनी सुमारे 600 किलो प्लास्टिक जप्‍त केलेे. बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिकचा वापर व विक्री करू नये, असे आवाहन महापालिकेने मनपा हद्दीतील उत्पादक, विक्रेते, व्यावसायिक तसेच नागरिकांना केले आहे. 

प्लास्टिक विल्हेवाटीसाठी यांच्याशी साधा संपर्क 

तसेच ज्या नागरिकांकडे घरात प्लास्टिक असेल त्यांनी त्यांच्या विभागातील विभागीय ़स्वच्छता निरीक्षक यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे विल्हेवाटीसाठी सुपूर्द करावे, असे कळविण्यात आले आहे. विभागनिहाय स्वच्छता निरीक्षकांचे नाव आणि संपर्क क्रमांक - 

संजय गांगुर्डे, (सिडको)- 9423179171, संजय गोसावी, (नाशिकरोड)- 9423179176, संजय दराडे, (पंचवटी)- 8275088513, सुनील शिरसाठ, (नाशिक पूर्व)- 9423179173, दिलीप चव्हाण, (नाशिक पश्‍चिम)- 9881062167, माधुरी तांबे, (सातपूर)- 9423179175