Tue, May 21, 2019 18:29होमपेज › Nashik › पावणेसहा लाखांचा दारूसाठा जप्‍त

पावणेसहा लाखांचा दारूसाठा जप्‍त

Published On: Apr 29 2018 2:08AM | Last Updated: Apr 28 2018 11:12PMनाशिक : प्रतिनिधी

परराज्यातील दारूसाठा अवैधरीत्या आणून विक्री करण्याच्या प्रयत्नातील संशयितांकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पाच लाख 75 हजार रुपयांचा अवैध दारूसाठा जप्‍त केला आहे. यामध्ये दोन चारचाकी वाहने आणि दारूसाठ्याचा समावेश असून, दोघांना अटक केली आहे. 

विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्‍त पी. पी. सुर्वे, अधीक्षक सी. बी. राजपूत, उपअधीक्षक जी. व्ही. बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात नाकाबंदी केली जात आहे. त्यानुसार भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक प्रवीण मंडलिक हे त्यांच्या पथकासह हरसूल भागात गस्त घालत होते. त्यावेळी 27 एप्रिलला रात्रीच्या सुमारास बेलपाली गावाकडून हरसूलच्या दिशेने अल्टो कार येताना दिसली. पथकाने ही कार अडवून तपासणी केली असता कारमध्ये दादरा-नगर हवेलीनिर्मित दारू आढळून आली.

पोलिसांनी अल्टो कारसह दारूसाठा जप्‍त केला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास ठाणेपाडा-हरसूल रस्त्यावरून बोलेरो कारची तपासणी केली असता त्यात अवैध दारूसाठा आढळून आला. पथकाने दोन्ही घटनांमध्ये रमेश अशोक धनगर आणि मुकेश भाऊराव दळवी (दोघे रा.  हरसूल, ता. त्र्यंबकेश्‍वर) या दोघांना अटक केली आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक माधव तेलंगे, सहायक दुय्यम निरीक्षक मनोहर गरुड, वीरेंद्र वाघ, विलास कुवर, दीपक आव्हाड, संतोष कडलग यांनी पार पाडली. 

Tags : Nashik, 6 lakh, Liquor stores, seized,