Sat, Jun 06, 2020 07:27होमपेज › Nashik › 574 गावांचा पाणीप्रश्‍न सुटणार

574 गावांचा पाणीप्रश्‍न सुटणार

Published On: Aug 26 2018 1:28AM | Last Updated: Aug 26 2018 12:10AMनाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठ्यासाठी 82 योजनांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. 2018-19 च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त 574 गावांमधील पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न कायमचा मिटणार आहे. 

दुष्काळग्रस्त भागांसाठी वरदान ठरणार्‍या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनांना केंद्र सरकारने मार्च 2015 मध्ये ब्रेक लावला. तसेच या योजना संसद आदर्श ग्राम व गुणवत्ता बाधित गावांमध्येच राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फटका राज्यातील गावांना बसला. परिणामी गेल्या दोन वर्षांत योजनांच्या मंजुरीची संख्या अगदी नगण्य अशी होती. त्यामुळे अनेक गावांना डिसेंबरपासूनच भीषण पाणीटंचाईला तोेंड द्यावे लागत होते. दुष्काळी परिस्थिती विचारात घेता सरकारने राज्यातील योजनांबाबत केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्याकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले आहे. केंद्र सरकारनेे 2018-19 मध्ये राज्यातील पाणीपुरवठा योजना हाती घेण्यासाठी परवानगी दिली आहे.

त्याबाबतचा  आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सुचविलेल्या सर्व योजनांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केलेल्या पाणीपुरवठा योजनांचा समावेश करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील 574 वाड्या-वस्त्या व गावांसाठी 298 योजनांचा समावेश आराखडा तयार करण्यात आला. या योजना राबविण्यासाठी एकूण 501 कोटी 86 लाख रुपये एवढा अंदाजे खर्च लागणार आहे. तसेच आराखड्यामध्ये मागील चालू असलेल्या योजनांसाठी 10 कोटी सहा लाख रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. नवीन व सुरू अशा 587 गावे-वाड्यांमधील 310 योजनांसाठी एकूण 511 कोटी 92 लाखांच्या आराखड्याला अंतिम मान्यता देण्यात आली आहे.