Mon, Apr 22, 2019 15:38होमपेज › Nashik › सात महिन्यांत 52 शेतकर्‍यांनी संपविले जीवन

सात महिन्यांत 52 शेतकर्‍यांनी संपविले जीवन

Published On: Jul 18 2018 1:54AM | Last Updated: Jul 17 2018 11:45PMनाशिक : प्रतिनिधी

नैराश्येच्या गर्तेत सापडलेला शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत. जिल्ह्यात नुकत्याच दोघा शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यात अवघ्या सात महिन्यांत आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांचा आकडा 52 झाला असून, या घटना रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.  

पहिली घटना निफाड तालुक्यातील वावी येथे घडली असून, श्याम त्र्यंबक हिरे (25) या तरुण शेतकर्‍याने शुक्रवारी (दि.13) दुपारी 2 वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. तर याचदिवशी मालेगावमधील आघार येथे साहेबराव भरत मगर (43) यांनीही गळफास घेत जीवनप्रवास संपविला. केंद्र सरकारने 13 पिकांना नुकताच हमीभाव घोषित केला आहे. दुसरीकडे राज्य सरकारने गतवर्षी शेतकर्‍यांना दीड लाखापर्यंतची कर्जमाफी दिली. परंतु, या उपाययोजनानंतरही बळीराजासमोरील समस्यांचा डोंगर आजही कमी झालेला नाही. जिल्ह्यात चालूवर्षात 52 शेतकर्‍यांनी नैराश्य, शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव यातून आपला जीवनप्रवास संपविला आहे. आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांमध्ये युवा शेतकर्‍यांची संख्या अधिक आहे. 

अवर्षणग्रस्त मालेगाव तालुक्यात सर्वाधिक 10 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. त्या खालोखाल बागायतदारांचा तालुका म्हणून ओळख निर्माण केलेल्या निफाड तालुक्यात आठ आत्महत्या झाल्या आहेत. दुसरीकडे मात्र, पेठ, सुरगाणा आणि कळवण या आदिवासी तालुक्यांमध्ये एकही आत्महत्या झालेली नाही, ही जिल्ह्याच्या थोडीफार जमेची बाजू म्हणावी लागेल. दरम्यान, शेतकरी आत्महत्येची दिवसेंदिवस वाढणारी आकडेवारी बघता ही भूषणावह बाब नाही. या आत्महत्या थांबवायच्या असल्यास शेतकर्‍यांसाठी ठोस अशा उपाययोजना करण्याची गरज आहे.