Wed, Jul 17, 2019 20:05होमपेज › Nashik › 500 प्रमाणपत्रे पडताळली, पण बनावट किती आढळली? 

500 प्रमाणपत्रे पडताळली, पण बनावट किती आढळली? 

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 15 2018 1:20AMनाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 500 शिक्षकांच्या अपंग प्रमाणपत्राची पुनर्रपडताळणी झाली असली तरी प्रत्यक्षात मात्र नेमके किती बनावट आढळले, त्याप्रकरणी काय कारवाई झाली, याबाबत मात्र गटविकास अधिकार्‍यांकडून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला अहवालाची प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे, आरोग्य कर्मचारी संघटनेचा नातेवाईक असलेल्या शिक्षकावर बागलाणच्या गटविकास अधिकार्‍याकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. 

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपकुकमार मीना यांच्या काळात अपंग बनावट प्रमाणपत्रांचा मुद्दा उपस्थित झाला असून, बनावट अपंग हुडकून काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. बागलाण तालुक्यातील चार शिक्षकांनी प्रमाणपत्रात फेरफार केल्याचा आरोप असून, नाशिक तालुक्यातील एका शिक्षकाचे प्रमाणपत्र बनावट आढळले आहे. मीना यांच्यानंतरही बनावट अपंग प्रमाणपत्रांचा मुद्दा थांबलेला नाही. 500  शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पुनर्रपडताळणी करून घेण्यात आली आहे. गटविकास अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून, या समितीवर अपंग प्रमाणपत्र असलेल्या शिक्षकांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पण, अद्याप एकाही गटविकास अधिकार्‍याने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पाठविलेला नसल्याने पाचशेपैकी नेमके किती प्रमाणपत्र बनावट अन् त्या अनुषंगाने दाखल केलेल्या गुन्ह्यांची माहिती समोर येऊ शकली नाही. गटविकास अधिकार्‍यांकडून शिक्षकांना पाठीशी घालण्याची घेतली जात असलेली भूमिका संशयास्पद ठरली आहे. बागलाण तालुक्यातील आर. के.खैरनार नामक शिक्षकाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे सिद्ध झाल्यानंतर गटविकास अधिकारी मात्र गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यावर शिक्षण विभागाने या गटविकास अधिकार्‍याला नोटीस दिली आहे. 

मुख्यालयातही कनिष्ठ प्रशासन अधिकार्‍याचे प्रमाणपत्र बनावट आढळले असताना पुनर्रतपासणीसाठी ते जे.जे. रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे या अधिकार्‍याचे आधीचे प्रमाणपत्र बनावट असताना त्याने सादर केलेले दुसरे प्रमाणपत्रही बनावट निघाले तरीही प्रशासन मात्र फेरपडताळणीतच अडकल्याने संबंधितांभोवती संशयाचे धुके दाटले आहे.