Tue, Apr 23, 2019 09:35होमपेज › Nashik › डिजिटल स्वाक्षरीत अडकले जातीचे 500 दाखले

डिजिटल स्वाक्षरीत अडकले जातीचे 500 दाखले

Published On: May 19 2018 1:34AM | Last Updated: May 18 2018 11:53PMनाशिक : प्रतिनिधी

नाशिक प्रांताधिकारी कार्यालयात डिजिटल स्वाक्षरीत दहा-वीस नव्हे तर तब्बल 500 दाखले अडकले आहेत. अधिकार्‍यांकडे वेळ नसल्याने दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांना दररोज कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागत आहे. प्रलंबित दाखल्यांची संख्या बघता ऑनलाइन दाखले वितरणाचा ढांढोरा पिटणार्‍या जिल्हा प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पुढील महिन्यात नुतन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ होणार असून, प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जातीच्या दाखल्यांसाठी विद्यार्थी अर्ज करत आहेत. एकीकडे प्रशासनाकडून डोमिसाइल, नॅशनॅलिटी तसेच उत्पन्नाचे दाखले वितरणाचे काम सुरळीत सुरू असताना प्रशासनाच्या डेस्कवर आजमितीस तब्बल 500 दाखले पडून आहेत.

वास्तविक पाहता नाशिक प्रांतची अतिरिक्त जबाबदारी सध्या उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सोपान कासार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. कासार यांच्याकडे ग्रामपंचायत विभागाचा देखील पदभार आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, येत्या 28 तारखेला मतदान होणार आहे. तसेच प्रशासनाने विधान परिषद निवडणुकीतही कासार यांना समाविष्ट करून घेतले आहे. एकाच अधिकार्‍याकडे कामाचा एवढा व्याप असल्याने वेळेत दाखल्यांचा निपटारा होणार कसा, हाच खरा कळीचा मुद्दा आहे. 

ऑनलाइनचा उडणार फज्जा

जिल्हा प्रशासनाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून नाशिक शहरात ऑनलाइन दाखले देण्यास प्रारंभ केला आहे. घरबसल्या सर्वसामान्यांना वेळेत आणि ठरवून दिलेल्या शुल्कात दाखले उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन खुद्द जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनीच दिले आहे. मात्र, एकट्या नाशिक प्रांताकडे जातीच्या प्रलंबित दाखल्यांची संख्या पाहता ऑनलाइन सुविधेचा फज्जा उडण्याची शक्यता आहे.