Wed, Apr 24, 2019 11:31होमपेज › Nashik › ५० हजार नागरिकांना मनपा देणार  स्मार्ट कार्ड

५० हजार नागरिकांना मनपा देणार  स्मार्ट कार्ड

Published On: Dec 07 2017 1:32AM | Last Updated: Dec 06 2017 11:25PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

कॅशलेस इकॉनॉमीला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका व येस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट प्रीपेड कार्ड तयार करण्यात आले असून, नियमित कर भरणार्‍या नागरिकांना या कार्डचे वितरण बुधवारी (दि.6) महापालिकेच्या मुख्यालयात करण्यात आले. शहरातील 50 हजार नागरिकांना कार्ड देण्यात येणार असून, या कार्डद्वारे नागरिकांना महापालिकेच्या सर्व करांचा भरणा करता येणार आहे. 

मनपाचे हे स्मार्ट कार्ड इतर कोणत्याही कार्डप्रमाणे मॉल्स, शॉपिंग सेंटर्स व अन्य इतर सर्व ठिकाणी वापरता येणार आहे. करदात्यांच्या नावांची यादी मनपा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या करदात्यांना स्मार्ट प्रीपेड कार्ड प्राप्‍त करून घेण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. स्मार्ट कार्डकरीता नागरिकांना केवायसी कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. त्यानंतर हे कार्ड वितरित करण्यात येईल. कार्ड मनपातील सर्व ई-सुविधा केंद्र, उपकार्यालयांमध्ये कार्यालयीन वेळेत वितरित करण्यात येणार आहे. कार्डाद्वारे सर्व प्रकारचे देयके, सेवाशुल्क् भरता येईल.  कार्डवर कॅश रिलोड व कॅश ट्रान्स्फरसारख्या सुविधा उपलब्ध् करून देण्यात आलेल्या आहेत. केवायसीकरीता आधारकार्ड अनिवार्य असेल. हे प्रीपेड कार्ड असल्याने नागरिकांनी कार्ड रिचार्ज करणे आवश्यक असल्याचे महापालिकेने कळविले आहे. कार्ड प्रदान डेस्कमार्फत कार्ड किट देण्यात आलेल्या नागरिकांना कार्ड सक्रियतेबाबत त्यांच्या मोबाइलवर अलर्ट प्राप्‍त होईल.