Tue, Jul 16, 2019 21:49होमपेज › Nashik › राज्यात विस्तार व माध्यम अधिकार्‍यांची ५० पदे रिक्‍त

राज्यात विस्तार व माध्यम अधिकार्‍यांची ५० पदे रिक्‍त

Published On: Dec 28 2017 1:45AM | Last Updated: Dec 28 2017 1:38AM

बुकमार्क करा
नाशिक : गौरव अहिरे

आजारपणास प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करणे, राज्य शासनाच्या आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी असलेल्या जिल्हा विस्तार व माध्यम अधिकार्‍यांची राज्यभरातील 50 पदे रिक्‍त आहेत. नागपूर वगळता एकही जागा पूर्णवेळ अधिकार्‍यांमार्फत न भरल्याने आरोग्य शिक्षणातून जनजागृती करण्याचे धोरण रिक्‍त पदांमुळे धुळीस मिळत आहे.

स्त्रीभ्रूण हत्या, कुटुंब कल्याण नियोजनाचे महत्त्व पटवून देण्यासह विविध आजारपणापासून दूर राहण्यासाठी काय खबरदारी घेतली पाहिजे. तसेच, शासनाच्या आरोग्य योजना नागरिकांना समजावून सांगण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील एक आणि राज्यातील सात आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केेंद्रात प्रत्येकी दोन अशी जिल्हा विस्तार व माध्यम अधिकार्‍यांची वर्ग दोनची 51 पदे आहेत. त्यापैकी नागपूर येथील एक पदावर नियुक्‍ती करण्यात आली असून, इतर पदे रिक्‍त किंवा अतिरिक्‍त पदभाराद्वारे भरली आहेत. जिल्हा विस्तार व माध्यम अधिकार्‍यांसाठी दिल्ली येथे लाखो रुपये खर्च करून प्रशिक्षण दिले जात असते. 2008 मध्ये या पदासाठी जाहिरात काढण्यात आली होती. 

दरम्यान, या निवडप्रक्रियेत जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांना 40 वर्षांपर्यंत वयोमर्यादेची अट ठेवल्याने त्यांनी न्यायालयात दाद मागितली. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने निवडप्रक्रिया थंडावली. दरम्यान, वर्ग दोनची ही पदे राज्यभरात रिक्‍त असल्याने आरोग्य विभागाच्या महत्वपूर्ण योजनेला घरघर लागली आहे. 

अधिकार्‍यांना दिलेली कामे 

प्रत्येक जिल्ह्यात स्त्रीभ्रूणहत्येच्या विरोधासाठी जनजागृती करणे, जनसंपर्क वाढवणे, आरोग्य शिबिर, लोककला, कलापथक, पथनाट्य, यात्रेत आरोग्य शिक्षण कार्यक्रमाद्वारे जनजागृती करणे, अशी कामे जिल्हा विस्तार व माध्यम अधिकार्‍यांच्या निरीक्षणात होतात. आरोग्य शिक्षणातून जनजागृतीचे कार्यक्रम योग्यरीत्या राबवले जात आहेत किंवा नाही, याचे निरीक्षणाचे कामही या अधिकार्‍यांकडे असते.