Wed, Jul 17, 2019 18:05होमपेज › Nashik › धक्‍कादायक! धुळ्यात मुलं पळविणारी टोळी समजून सोलापूरच्या ५ जणांची हत्या(Video)

धक्‍कादायक! धुळ्यात मुलं पळविणारी टोळी समजून सोलापूरच्या ५ जणांची हत्या(Video)

Published On: Jul 01 2018 4:14PM | Last Updated: Jul 01 2018 6:42PMधुळे : प्रतिनिधी

धुळे जिल्हयातील साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात जमावाने केलेल्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची  घटना आज दुपारी घडली. मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून या तरूणांना मारहाण झाल्याने ग्रामपंचायत कार्यालयात या तरूणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर वरीष्ठ पोलिस अधिकारी या गावात दाखल झाले असून मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू झाले आहे. प्राथमिक तपासात मयत तरूण हे सोलापूर जिल्हयातील रहिवासी असल्याची माहिती पुढे येते आहे. या मारहाणप्रकरणी आतापर्यंत १० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

धुळे जिल्हयामधे गेल्या महिन्याभरापासून मुले चोरी करणारी टोळी आल्याची अफवा मोठया प्रमाणावर पसरली आहे. यातून भितीचे वातावरण तयार झाले आहे. जवळच्या नंदुरबार जिल्हयात अशा संशयातून मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. त्यातच आज, रविवारी दुपारी साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात जमावाने पाच जणांना मारहाण करून ठार केल्याचा प्रकार झाला आहे. 

वाचा  : ब्‍लॉग : 'सोशल' आंधळ्यांचं कृष्णकृत्य

आज राईनपाडा गावात आठवडे बाजार सुरू होता. त्यामुळे परिसरातील आदिवासी पाड्यामधून मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ खरेदीसाठी आले होते. अशा स्थितीत बाजारात राईनपाडा लगतच्या काकरपाडा येथे मुले पकडणारी टोळी फिरत असल्याची अफवा बाजारात पसरली. त्यामुळे काही तरूणांनी या पाडयावर जावून पाहिले असता गावात भिक्षा मागणारे पाच जण त्यांना फिरताना दिसले. या तरूणांनी या भिक्षेकरींना मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाण करीतच या सर्व जणांना राईनपाडा गावातील ग्रामपंचायतीच्या सभागृहात आणले गेले. या दरम्यान त्यांना मारहाण करणे सुरूच होते. पाचही तरूणांना कार्यालयाच्या एका खोलीत नेण्यात आले. मात्र ही अफवा मोठ्या प्रमाणावर पसरत असतांना अनेक काल्पनीक गोष्टी देखील पसरल्याने जमाव संतप्त झाला. त्यांनी सामूहिकपणे या पाचही जणांना जबर मारहाण करण्यास सुरूवात केली. 

या तरूणांना कार्यालयात बसवून दरवाजे बंद करण्यात आले. मात्र जमावाने लोखंडी दरवाजे तोडून आत प्रवेश केला. यानंतर दगड, लोखंडी खुर्च्या आणि अन्य वस्तुंनी डोक्यावर गंभीरपणे मारहाण करून या पाचही तरूणांना अक्षरश: ठेचण्यात आले. या मारहाणीत पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर राईनपाडासह अन्य गावात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच धुळ्याचे पोलिस अधिक्षक रामकुमार, अपर पोलिस अधिक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह पोलिस निरीक्षक दिवाणसिंह वसावे, हेमंत पाटील, आणि दंगा नियंत्रण पथकास राईनपाडा गावात पाठविण्यात आले.

यावेळी संतप्त जमावाने पोलिस पथकाला देखील गावात येण्यास विरोध दर्शविला. तब्बल एक तासानंतर हे पथक गावात पोहोचले. यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रूग्णालयात रवाना करण्यात आले आहेत. 

मृत पाचजण सोलापूर जिल्‍ह्यातील

मयत झालेले सर्व तरूण हे सोलापूर जिल्हयातील मंगळवेढा परीसरातील राहणारे असून ते गोसावी समाजाचे आहेत. भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. हे तरूण भिक्षा मागण्यासाठीच आदिवासी पाडयांवर फिरत होती. आज राईनपाडा गावात आठवडे बाजार असल्याने पैसे मिळतील या आशेने हे तरूण या गावात आले होते. मात्र अफवेने या सर्व तरूणांचा बळी गेला आहे. यातील एका तरूणाचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून या मोबाईलच्या माध्यमातून मृत तरूणांची ओळख पटविण्याचे काम सुरू झाले आहे. 

यातून दोघांची ओळख पटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यात दादाराव शंकर भोसले, नारायण पांडुरंग गोसावी या दोन नावांची ओळख पटली आहे. तर उर्वरीत तिघांचे नातेवाईक साक्री येथे आल्यानंतर त्यांची खरी ओळख पटणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

जमाव मारत होता अन् ते विनवत होते

दरम्यान, या तरूणांना मारहाण होत असतांना अनेकांनी मोबाईलमधे शूटिंग करणे सुरू केले. मारहाण होत असतांना पाचही तरूण जिवाच्या आकांताने मदतीची भिक मागत होते. मात्र त्यांना दया दाखविण्याऐवजी गर्दीमधे येणारा प्रत्येक जण मारहाण करीत होता. हीच स्थिती ग्रामपंचायतीच्या कार्यालयात होती. या कार्यालयात जखमी अवस्थेमध्ये देखील तिघांनी जमावाची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू केला. पण जमावाने त्यांचे काहीच ऐकले नाही. 

इथे माणुसकी ओशाळली

काही वेळातच लोखंडी खुर्च्या , रॉड तसेच दगडाने ठेचून या पाचही जणांना मारहाण करणे सुरू झाले. यावेळी देखील काही लोकांनी मदत करण्याऐवजी शूटिंग करणे सुरू ठेवले. विशेष बाब म्हणजे मारहाणीनंतर शेवटचे आचके देत असतांनाही शूटिंग करणे सुरूच असल्याचे सांगितले जाते आहे. यातून माणुसकी ओशाळल्याचे चित्र दिसून आले आहे.

►माजी नगरसेवक डोंबे यांना चोर समजून मारहाण

सोशल मीडियावरून चुकीच्या अफवा व्‍हायरल होतात. झाल्या प्रकाराची सखोल चौकशी करणार आहोत. उद्या, २ जुलै रोजी धुळे जिल्‍ह्याचा दौरा करणार

-गृहराज्यमंत्री दीपक केसरकर