Sat, Jul 20, 2019 09:15होमपेज › Nashik › खराब कांद्याच्या चाऱ्यामुळे पाच गायी दगावल्या 

खराब कांद्याच्या चाऱ्यामुळे पाच गायी दगावल्या 

Published On: Jul 04 2018 9:35AM | Last Updated: Jul 04 2018 9:35AMउगांव (नाशिक) : वार्ताहर

नाशिक जिल्हयातील निफाड तालुक्यातील श्रीरामनगर गाईंना चाळीत साठविलेल्या कांद्यातुन खराब ,कांद्याचे अवशेष खाऊ घातल्याने पाच गाईंचा एकाचवेळी मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.यामुळे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, निफाड तालुक्यातील श्रीरामनगर (कोळवाडी) येथील कांदा व द्राक्ष उत्पादक पोपट छबु निकम हे शेती बरोबरच जोड म्हणून गाईचे संगोपान करुन दुध व्यवसाय करतात. दुग्धोत्पादनासाठी त्यांचेकडे पाच गाई होत्या पैकी  दोन गाई मोठ्या व तीन लहान गाई होत्या. मोठ्या गायी गाभ होत्या. निकम कुटुंबाने उन्हाळ्यात कांदा चाळीत साठविलेला होता. कांदा चाळीत सडु नये व खराब होऊ नये म्हणून पोपट निकम यांनी त्यावर फवारणी केलेली होती. नुकतेच कांद्याचे बाजारभाव वाढल्याने चाळीतील कांदा प्रतवारी करुन बाजारपेठेत नेल्यानंतर उरलेले अवषेश बाजुला काढलेले होते. शेतकरी पोपट निकम हे मुलासह बाहेरगांवी कामानिमित्त गेले  असताना‌ कुटुंबातील इतर सदस्यांनी चाळीचा परिसर स्वच्छ केला. त्यांनतर शिल्लक राहिलेले खराब कांदे व कांद्याचे अवशेष वाया जाण्यापेक्षा जनावरांना चारा म्हणुन घातले. त्यानंतर काही तासांनी सर्वच जनावरे जागेवर पडु लागल्याने निकम परिवाराने तात्काळ पशुवैद्यकिय डॉक्टरांना पाचारण केले. मात्र, कसोशिने प्रयत्न करुनही सायंकाळी उशीरा पाचही गायीं दगावल्या. या घटनेने निकम परिवाराला मोठा धक्काच बसला आहे. श्रीरामनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त  करण्यात येत आहे.