होमपेज › Nashik › मालेगाव @ 44.4

मालेगाव @ 44.4

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 07 2018 11:54PMनाशिक : प्रतिनिधी

सोमवारी नाशिकमध्ये 39.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून मालेगावचे तापमान 44.4 अंश सेल्सिअसवर पोहचल्याने उकाडा आणि घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत. एप्रिलमध्ये तापमानाचा पारा चाळिशीपर्यंत पोहोचला होता. कित्येक दिवस तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यानच होते. सकाळी दहापासूनच उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडणार्‍यांची संख्या कमीच होती. चालू महिन्यातही तापमानाचा आलेख चढताच आहे. या आठवड्याच्या सुरूवातीलाच 39.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने उन्हाची तीव्रताही कायम होती.

उन्हाच्या झळा असह्य होत असल्याने दुपारी बारानंतर घराबाहेर पडण्याचे धाडस कोणी दाखवित नाही. त्यामुळे पाचपर्यंत मुख्य रस्त्यांवरील वर्दळही कमी असल्याचे चित्र आहे. उन्हाच्या तडाख्याचा परिणाम शहरातील प्रमुख बाजारपेठांवरही जाणवत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी स्कार्फ, गॉगल, टोपीचा आधार घेतला जात आहे. मालेगावमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तापमान चाळीशीच्या पार गेले आहे. सोमवारी 44.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. उन्हाचा तडाखा अजून वीस -बावीस दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.